कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत पोलिसांकडून शहरात 5 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली.
खूप वेळा सांगून न ऐकणार्यांना कोरोना झाल्यावर रुग्णांची काय अवस्था होते याचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी कर्जत पोलिसांनी त्यांना थेट उपजिल्हा रुग्णालयात नेऊन कोरोना परिस्थितीचे वास्तव दाखवले.
कोरोना पेशंट कशा प्रकारे उपचार घेत आहेत, औषधे, बेड, ऑक्सिजन याचा कसा काटकसरीने वापर सुरू आहे याबाबत उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे नेऊन विनाकारण फिरणे किती धोकादायक आहे याची जाणीव करून दिली. वारंवार सांगून सुद्धा न ऐकणार्यांना पोलीस ठाण्यात न्हेउन बसविले तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सुरेश माने, पोसई किरण साळुंखे, पोलीस जवान संतोष जसाभाटी, महादेव गाडे, बाळासाहेब यादव, शेख बळीराम काकडे, गोवर्धन कदम, वैभव खिळे, देवा पळसे, गणेश आघाव गोरख, गोरख जाधव तसेच होमगार्ड व पोलीस मित्र आदींनी मिळून केली आहे.
सध्याच्या महामारी मध्ये सर्वच ठिकाणी आरोग्य सुविधा पुरेशा नाहीत. विनाकारण बाहेर पडू नका. ज्यांना कोरोना झालाय आणि कोरोनामुळे ज्या कुटुंबांनी स्वतः च्या नातेवाईकाला गमावले आहे त्यांना काय होतंय ते विचारा. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे.- चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत


