कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत आणि जामखेड येथील शासकीय रुग्णालयात सुरू असलेला कोव्हिड सेंटरचा ऑक्सिजन पुरवठा संपत आला असुन तो रात्री साडे दहापर्यंतच पुरेल! त्यामुळे काहीही करून वेळेच्या आत त्याची उपलब्धता होणे गरजेचे आहे.आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा कर्जतच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कानावर आली.मग काय?सुरू झाली ती प्रशासकीय अधिकाऱ्यांची तळमळ अन् धावपळ!         
      ऑक्सिजन वेळेच्या अगोदर पुरवणे तर गरजेचे आहे पण करणार तरी काय? सगळे अधिकारी वेळ न दवडता एकत्र जमले.विचार विनिमय झाला. आणि ठरले..!तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तीन तुकड्या पाडल्या.यामध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,गटविकास अधिकारी अमोल जाधव व सोबत पोलिस कर्मचारी यांची एक तुकडी राशीनकडे, तर प्रांताधिकारी अर्चना नष्टे,तहसिलदार नानासाहेब आगळे,पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांची दुसरी तुकडी मिरजगाव येथे रवाना झाली तर नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव,सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश मानेंसह पोलिस कर्मचारी यांची तिसरी तुकडी कर्जत शहरात थांबली.तीनही तुकड्यांच्या प्रमुखांनी वेल्डिंग आणि फॅब्रिकेशनची दुकाने पिंजून काढली. या दुकानांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडर टाक्यांची दुकान चालकांना मागणी केली. 'ही वेळ कठीण आहे.तुम्ही दिलेल्या ऑक्सिजनमुळे अनेकांचे जीव वाचणार आहेत.हे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत संवादकौशल्यावर दुकान चालक स्वतःहून टाक्या देण्यास तयार झाले.आणि बघता-बघता तीन तुकड्यांकडे तब्बल ३६ टाक्या हाती लागल्या. त्यात राशीन परिसरातून २३ टाक्या तर १२ टाक्या मिरजगाव व कर्जत परिसरातून जमा झाल्या.सर्वांच्या मनात वेळेची धडकी भरली होती की आता फक्त वेळेत या टाक्या रुग्णालयात पोहोच करून कामगिरी फत्ते करायची.सर्व नियोजन करून वेळेच्या आतच १५ टाक्या जामखेड येथील कोव्हिड सेंटरमध्ये तर २१ टाक्या कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्या. सर्वांनी मिळून राबवलेले काम फत्ते झाले आणि सर्व अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन उपलब्ध होईपर्यंत हे सिलिंडर आता रुग्णांची गरज भागवणार आहेत.
        प्रशासकीय पदाच्या पलीकडे जाऊन या अधिकाऱ्यांनी केलेले हे काम खरोखरच प्रशंसनीय आहे.त्यांच्या या दर्जेदार कामाचे कर्जत-जामखेडच नव्हे तर जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

अन् त्यांचाही आता मदतकार्यात सहभाग!
        वेल्डिंग व फॅब्रिकेशन चालकांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला असुन रोज ४० ते ५० ऑक्सिजन टाक्या बारामती येथून ते भरून आणणार आहेत.रुग्णांसाठी हा शिल्लक स्वरूपात ऑक्सिजन साठा ठेवण्यात येणार आहे. या वाहतुकीसाठी त्यांना पोलीस ठाण्यामार्फत पत्रही देण्यात आले आहे.