
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणातून दुसरे उन्हाळी आवर्तन सोडले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा कालवा सल्लागार समिती चे सचिव बाजीराव थोरात यांनी दिली. सोमवार दि 10 मे रोजी सकाळी 9 वाजता हे आवर्तन सोडण्यात आले आहे. एकूण 20 दिवस हे आवर्तन असणार आहे. सीना धरणातून सोडण्यात आलेले उन्हाळी आवर्तन टेल टू हेड असे असणार आहे.
कालवा सल्लागार समिती मध्ये ठरल्याप्रमाणे हे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी होती त्यानुसार आवर्तन सोडण्यात आले आहे.
सीना धरणाची 2400 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असून सध्या 800 दशलक्ष घनफुट पाणी साठा उपलब्ध आहे.एका आवर्तनासाठी 300 दशलक्ष घनफुट पाणी लागत असून हे दुसरे उन्हाळी आवर्तन पिकासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहे.या आवर्तनात एकूण 1600 हेकटर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.सीना कालव्याचे नूतनीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय टळत आहे.
उन्हाळी पिकांसाठी या आवर्तनाचा फायदा होणार आहे. ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी आवश्यक असताना सीना धरणातून दुसरे आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी सुखावला आहे. कूपनलिका व विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. या आवर्तनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

