कर्जत (प्रतिनिधी) : जैन धर्मियांचे आराध्यस्थान अरिहंत भगवान यांची ४६ फुट उंचीची भव्य मूर्ती नाशिक पासून चाळीस किलोमीटर अंतरावर णमोकर तीर्थ येथे उभारण्यात येणार आहे.त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भव्य शिळेचे नुकतेच मिरजगाव येथे आगमन झाले.येथील जैन बांधवांनी मोठ्या उत्साहात या शिळेचे स्वागत करून विधिवत पूजन केले.
जैन धर्मगुरू आचार्य श्री १०८ देवनंदी महाराज यांच्या प्रेरणेने नाशिक-धुळे महामार्गावर णमोकर तीर्थ साकारण्यात येत आहे. याठिकाणी श्री अरिहंत,सिद्ध,आचार्य उपाध्याय,साधू यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापैकी अरिहंत भगवान यांची श्रवणबेळगोळ येथील विश्वप्रसिद्ध भगवान बाहुबली यांच्या मूर्तिसमान भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कर्नाटकातील देवनहळ्ळी (बंगळुरू) येथून अखंड पांढरी ग्रॅनाईट शिळा मालमोटारीतून नाशिककडे नेण्यात येत आहे.शेकडो किलोमीटरचा प्रवास करत ही शिळा बंगळुरू, हैद्राबाद, सोलापूर, मोहोळ मोडनिंब, टेंभुर्णी, करमाळा मार्गे मिरजगाव येथे दाखल झाली.येथील जैन बांधवानी १०८ कलशद्वारा अभिषेक,१०८ फुलांचा हार,पुष्पवृष्टीसह,१०८ लाडुप्रसाद अर्पण करत शिळेचे पूजन केले. यावेळी धीरज धोंगडे,संतोष गडकर,संजय गडकर,महावीर ढोले,सतिश धोंगडे,वैभव धोंगडे,राजुशेठ भंडारी,वर्धमान सिद्धेश्वर,सुधीर एखंडे,मुन्नाशेठ भंडारी,पंकज धोंगडे,शशिकांत धोंगडे,अमोल धोंगडे, रेखा महाजन, जयश्री एखंडे,महेश धोंगडे,संतोष ढोले आणि सर्व जैन समाज श्रावक व श्राविका उपस्थित होते.

अखंड शिळेची वैशिष्टे-
• उंची  ६० फूट
• रुंदी ११ फूट
• जाडी ८ फुट
• ३६५ टन वजन
• १४० चाकांच्या ट्रकमधून वाहतूक

शिळा नाशिकपर्यंत पोहोचविण्यासाठी जैन समाजाचे सर्व कार्यकर्ते मदत करणार असल्याचे अभिजीत धोंगडे यांनी यावेळी सांगितले.