
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील नागलवाडी शिवारात सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर प्रांताधिकारी अर्चना नष्टे व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत वाहने जप्त केली आहेत.
२७ मे रोजी सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना मिळाली होती, त्यानुसार तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पथक तयार करत संयुक्त कारवाई केली. या कारवाई मध्ये चार ट्रॅक्टर, एक टिपर, एक जेसीबी जप्त करून प्रांत कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहेत. सदर वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ (७) नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईने सीना पट्ट्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
या करवाईमध्ये प्रांताधिकारी अर्चना नष्टे,तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ,नायब तहसीलदार मनोज भोसेकर, तलाठी धुळाजी केसकर, अविनाश रोडगे, गणेश सोनवणे, दिनेश वास्ते, अभिजीत शेलार, विकास सोनवणे, दीपक बिरुटे, निलेश साळुंखे, हरिश्चंद्र नांगरे, मिरजगाव बीट चे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.


