स्मार्ट कर्जत न्यूज नेटवर्क : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाच्या इ. १० वी च्या परीक्षा रद्द केल्याने राज्य शासनाने सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट  उत्तीर्ण करण्याबाबत राज्य मंडळास परवानगी दिली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
संबंधित सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना  गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे.  सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. 






खालील निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांचे अंतिम निकाल निश्चित करण्यात येईल
● इ. १०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन : ३०गुण
● इ. १०वीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन : २०गुण.
● इ. ९वी चा विषयनिहाय अंतिम निकाल : ५०गुण. 




सदर मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोविड-१९ पूर्व काळातील (सामान्य परिस्थितीमधील) संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या इ.१० वीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (इ.९वीचा) निकाल कोविडपूर्व मूल्यमापनावर आधारित आहे. 'सरल' प्रणालीवर या निकालाची नोंद आहे. 



◆ जे विद्यार्थी ह्या निकालाने असमाधानी असतील, त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल. 
◆विद्यार्थ्यांचे निकाल अंतिम करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. 
◆ मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे. 
◆ पुनर्परीक्षार्थी,खाजगी,तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजनेंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांना लागू पुढील १ किंवा २ संधी अबाधित राहतील. सर्व शाळा,विद्यार्थी,पालकांनी मूल्यमापनाबाबतच्या सूचना काळजीपूर्वक समजून घ्याव्यात.
◆ हे काम आव्हानात्मक आहे पण मला खात्री आहे की शाळा, मुख्याध्यापक व शिक्षक हे आव्हान स्वीकारून ते यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.