कर्जत, दि.१४ जून(प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अजूनसुद्धा अवैध सावकारकी सुरू आहे.
नागरिक सुद्धा अडचणीच्या वेळी अशा सावकारांकडून अचानक गरज भासल्याने व्याजाने पैसे घेतात.
सावकार अगदी 5 ते 10 टक्के प्रति शेकडा प्रति महिना एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्याजदर आकारतात. वर्षाला 60 ते 120 टक्के व्याजदर होतो.
एवढा अव्वाच्या सव्वा व्याजदर असल्याने ज्याने पैसे घेतले तो परतफेड करूच शकत नाही. उलट एका सावकाराचे पैसे देण्यासाठी दुसऱ्या सावकारांकडून घेऊन पहिल्याला देतात आणि घेणारा माणूस या दुष्ट चक्रात अडकत जातो, रुतून बसतो.
याचा आणखी गैरफायदा सावकार घेतात आणि पैसे घेणाऱ्याकडून काही वस्तू जसे टीव्ही, गाड्या किंवा इतर काही घेतात प्रसंगी ओढून आणतात.
मोठ्या प्रमाणावर जमिनी लिहून घेतात. जमीन लिहून घेताना खरेदीखत करून घेतात आणि खरे नुकसान त्यावेळी होते.
अवैध सवकरकीची वसुली करण्यासाठी वारंवार फोन करणे, घरी येणे, ज्याने पैसे घेतलेत त्यांना तसेच घरच्या महिलांना सुद्धा शिवीगाळ करणे, धमक्या देणे असे प्रकार करतात. असे सावकार निर्ढावलेले असतात.
समाजात दाखवायचं वेगळं आणि आतून सवकारकी करायची.
त्यांना माहिती असत की पैसे घेणारा कुठेही जाणार नाही कारण तो या सर्वामध्ये पुरता अडकला असतो.
आमच्याकडे येऊन तक्रारदार अक्षरशः रडतात.
काही नागरिक आपले गाव सोडून जातात. काही लोक आत्महत्येचा विचार करतात तर काही आत्महत्या करतात.
खूप लोकांकडून अशा सावकारांनी कोरे चेक घेतले आहेत, घेत असतात, असे चेक देऊ नका.
परंतु कर्जतकरांनो घाबरण्याची आवशक्यता नाही. पोलीस ठाण्यात या, आपण तक्रार समजून घेऊ. तक्रार दाखल करू. काही लोकांना तक्रार दाखल न करता वाद मिटवायचा असतो, तसही करता येईल. विश्वासाने कर्जत पोलिसांना तक्रार द्या नक्की तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल. सावकार कितीही मोठा असू द्या घाबरू नका, तुम्हाला नक्की मदत होईल.
चंद्रशेखर यादव,
पोलीस निरीक्षक,
कर्जत पोलीस स्टेशन.
9923630652


