चिंचोली रमजान नजीक रस्त्याच्या कडेच्या चिखलात फसलेला मिक्सर जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला.

कर्जत,दि.१७ जून (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्याचे काम रखडलेले काम सुरू होण्यास अजून कमीत कमी दोन महिने लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित निमकर यांनी दिली.

सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्याचे ३० किमी चे काम सहा महिन्यांपासून रखडलेले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी टाकलेली आहे, रस्ता उकरून ठेवलेला आहे, काम चालू असलेबाबतचे दिशादर्शक फलक या मार्गावर कुठे दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाश्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता पावसाळा सुरू झाला असून मार्गावर बांधलेल्या पुलांच्या ठिकाणी टाकलेल्या मातीमुळे, रस्त्याच्या बाजूच्या उकरलेल्या मातीमुळे चिखल तयार होत आहे. या चिखलातून प्रवाश्यांना वाट काढणे मुश्किल होत आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने रात्री अपरात्री अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेब्रुवारी महिन्यात रस्त्याच्या अर्धवट कामामुळे  कोंभळी नजीक स्विफ्ट डिझायनर कार खड्ड्यात कोसळली होती. 

कोंभळी फाटा ते कर्जत चे काम असलेल्या एजन्सी कडे कर्जत ते खेड हे देखील काम होते. एजन्सीने दोन्हीकडे काम सुरू केल्याने नागरिकांच्या तक्रारी येत होत्या तसेच कर्जत ते खेड हे राज्य महामार्गात मोडत असून या मार्गावर वाहतून जास्त असल्याने अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मिटिंग मध्ये कर्जत ते खेड हे काम अगोदर करून घेण्याचे ठरले. या कामास कमीत कमी दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्याचे काम सुरू होणार आहे. काम सुरू होण्यासाठी अजून कमीत कमी दोन महिने मोजावे लागणार आहेत. या मार्गामध्ये वनविभागाची जवळपास ७.५ किमी ची लांबी असल्याने वन्य जीवन, पर्यावरण, वन विभाग परवानग्यासाठी अर्ज केलेले आहेत. परंतु या परवानग्यासाठी वेळ लागणार आहे.

ठेकेदाराकडून कामाला गती भेटत नसल्याने रस्त्याचे अर्थवट काम प्रवाश्यांच्या जीवावर बेतू शकते. काम पूर्ण करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.

रस्त्याच्या अर्धवट कामामुळे प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे , हे काम त्वरित सुरू करावे. लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास मोठे आंदोलन उभारू.

दिपक ननवरे

सामाजिक कार्यकर्ते, चिंचोली रमजान