कर्जत (प्रतिनिधी) : लग्नात मनासारखे वटकणे न लावल्याने रेशीमगाठ तुटल्याचा प्रकार नुकताच कर्जत तालुक्यात घडला होता. मुलीचे घरचे तसेच नातेवाईक आणि मुलाचे नातेवाईक यांनी सामंजस्याची भूमिका घेतली तसेच नातेवाईक आणि कर्जत पोलीस यांनी यशस्वी मध्यस्थी केली यामुळे या रेशीमगाठी पुन्हा जुळून आल्या आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांनी विवाह मार्गी लागल्याने दोन परिवाराची नाती जुळून आली आहेत.

नवरदेवाच्या ताटाला वधूपक्षाकडून वटकण लावण्याची प्रथा समाजात रूढ आहे. मात्र हौसेने करावयाची ही प्रथा विवाहबद्ध झालेल्या वधू-वरांच्या रेशिमगाठी सोडण्यास कारणीभूत  ठरली होती.  कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे रविवारी (दि.२०) हा प्रकार घडला . सिद्धटेकचा वर हा नांदगाव येथील मुलीशी विवाहबद्ध झाला होता. लग्न समारंभ उत्साहात साजरा झाला. पुढे कन्येला पाठवणीच्या पूर्वी वधूवरांना जेवू घालण्याचा कार्यक्रम सुरु झाला. प्रथेप्रमाणे वधूपक्षाकडून २०० रुपये वटकण म्हणून ताटाला लावण्यात आले.

मात्र तेवढ्यावर वरपक्षाकडील लोकांचे समाधान झाले नाही. यांच्याकडून वाढीव पैशाची मागणी होवू लागली. वधूपक्षाने त्यास स्पष्ट नकार दिला. रुसवेफुगवे टोकाला गेले. वधुपित्याने मुलीची पाठवणी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी वधुपित्याला समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो असफल झाला होता.

दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका तसेच नातेवाईक व कर्जत पोलीस यांच्या मध्यस्थीमुळे तुटलेल्या रेशीमगाठी जुळून आल्या, नववधू सासरी गेली. यशस्वी मध्यस्थी करणारे नातेवाईक, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह कर्जत पोलिसांचे कौतुक होत आहे.