कर्जत (प्रतिनिधी) : पिंपळवाडी येथील निवृत्ती परहर यांच्या घराला दुपारी 1 वाजेच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीचा प्रचंड वेग असल्याने काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केल्याने घरातील सर्व संसार उपयोगी वस्तु जळून खाक झाल्या आहेत. यावेळी तातडीने ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीला विझविण्यात यश मिळाले. मात्र तोपर्यंत घरातील धान्य, कागदपत्रे, कपडे, भांडी, रोख रक्कम, संसारपयोगी वस्तु, पशुखाद्य या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामुळे या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. सदर घर जुन्या छप्पर लाकडाचे असल्यामुळे पेट घेउन नुकसान झाले आहे. सदर ठिकाणी किसान युवा मोर्चा भाजपा कर्जत तालुका चिटणीस गणेश जंजीरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी तलाठी ढगे भाऊसाहेब यांना फोन करून माहिती दिली. तलाठी ढगे भाऊसाहेब यांनी घटनास्थळी येऊन पंचनाना केला आहे. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून या नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत करावी अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केली.


