सीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी पोलीस ठाण्याचा ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार

कर्जत (प्रतिनिधी) : गावात घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हा घडल्यास त्याचा तात्काळ तपास लागावा यासाठी कर्जतच्या पोलीस निरीक्षकांनी आता महत्वपुर्ण पाऊल उचलले आहे. प्रत्येक गाव सीसीटीव्ही कमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्यासाठी आता ग्रामपंचायतींनीच पुढाकार घेऊन काही निधी या प्रकल्पावर खर्च करावा असा पत्रव्यवहार त्यांनी पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामपंचायतींना करून आवाहन करण्यात केले आहे. 

      गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावात प्रवेश करत असलेले रस्ते,गावातील मुख्य चौक या ठिकाणी चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे त्याचबरोबर चोरी, दरोडा,जबरी चोरी,दंगे,मारामाऱ्या तसेच वेगवेगळ्या प्रकारचे वाद विवाद,महिलांसंदर्भात घडत असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. सीसीटीव्हीच्या निगरानीतुन गावे स्वसंरक्षित करण्याचा हा प्रकल्प गावातील प्रत्येक नागरिकाला हवाहवासा वाटतो परंतु यासाठी आर्थिक खर्चाचा विषय समोर येतो.तालुक्यातील शहरी भागात पोलिसांच्या आवाहाणानंतर लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यातही आले आहेत. मात्र ग्रामीण भागात सहसा आर्थिक मदतीसाठी कुणी पुढे येताना दिसत नाही त्यामुळे हा खर्च करायचा कुणी?असा प्रश्न निर्माण होतो. मात्र पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ग्रामपंचायतच्या निधीतून सीसीटीव्हीसाठी खर्च करता येईल का? याबाबत अधिक माहिती घेतली. याबाबत माहिती घेतल्यानंतर कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्याही चर्चा केली. त्यांना ग्रामपंचायतच्या निधीतून हा खर्च करण्याबाबत पत्रव्यवहार करून कळविण्याबाबत विनंती केली होती. ही संकल्पना प्रत्येक गावाच्या हिताची असल्याने ग्रामपंचायतींनाही यावर खर्च करता येईल अशा आशयाचे सकारात्मक पत्र पंचायत समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.कर्जत शहरात आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसणार असून आता ग्रामीण भागातील गावेही लवकरच सीसीटीव्हीच्या छायेखाली आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता ग्रामपंचायतींनी सक्रीय पुढाकार घ्यावा

आपल्या गावच्या संरक्षणासाठी चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व तेथील नागरिकांनी पुढाकार घ्यायचा आहे. ही यंत्रणा खरेदी करण्यापासुन ती कार्यान्वित करण्यापर्यंत पोलिस यंत्रणा मार्गदर्शन व मदत करेल.आपल्याला आपल्या गावाची 'गुन्हेगारीमुक्त गाव' अशी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे.

-चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक