कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथे अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून चोरी केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. बारडगाव सुद्रिक दादासाहेब सुद्रिक यांच्या घरी चोरट्यांनी रात्री दरवाज्याची कडी तोडून सोने व रोख रक्कम लंपास केली आहे. दादासाहेब सुद्रिक हे शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असताना त्यांच्या पत्नी घरातील दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. त्या खोलीला चोरट्यांनी कुलूप लावुन सोने ठेवलेल्या खोलीतील कपाटाची उचकपाचक करत हलाल सोने रोख रक्कम लंपास केली.ही चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शेजारी असलेल्या अशोक जंजीरे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. घराच्या बाहेर पडवीत झोपलेले अशोक जंजीरे व त्यांची पत्नी बदामबाई यांना चाकूचा धाक धाकवून सोने व रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. जंजीरे यांनी प्रतिकार करताच त्यांच्या हातावर चोरट्यांनी चाकूने वार केला. आवाज येताच घरात झोपलेला त्यांचा मुलगा नवनाथ जंजीरे जागा झाला. परंतु चोरट्यांनी दरवाजा बाहेरून लावल्यामुळे त्याने खिडकीतून पाहिले असता त्यांच्याकडे चोरट्यांनी चाकू फेकून मारला. चोरट्यांनी तिसऱ्या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील कुटुंबातील सदस्य आवाज येताच जागे झाल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. या घटनेमुळे बारडगाव सुद्रिक येथील ग्रामस्थ भयभीत झाले असुन चोरट्यांचा तपास लवकर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


