कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील खांडवी शिवारात भोसे - खांडवी रस्त्यावर जखमी तरस आढळून आला होता. या तरसाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जखमी झाला होता. या तरसावर प्रथमोपचार करत वनविभागाने त्याला जीवनदान दिले आहे. जखमी तरस आढळून आल्याची माहिती मिळताच तातडीने वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले, त्यांनी तरसास रेहकुरी येथे आणून प्रथमोपचार करून मांस खाऊ खातल्याने जखमी तरसाचे प्राण वाचले आहेत. सध्या तरसाला रेहकुरी येथे निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी तरसास पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती कर्जत प्रादेशिक चे वनक्षेत्रपाल गणेश छबिलवाड यांनी बोलताना दिली . पुणे येथे उपचारासाठी पाठविन्यासाठी नगर येथून परवानगी घेण्यात आल्याची माहिती छबिलवाड यांनी दिली.
यावेळी वनपाल रवी तुपे, अनिल खराडे, वनरक्षक विजय ननवरे, अजिनाथ ननवरे, अजिनाथ भोसले,मजूर असिफ शेख, वनमजुर किसन नजन आदी उपस्थित होते. अज्ञान वाहनाने धडक दिलेल्या जखमी तरसाचे प्राण वाचविल्याने वन्यप्रेमीकडून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.


