कर्जत,दि.०४ जुन (प्रतिनिधी) : काही ठिकाणी व्यावसायिक सुपर स्प्रेडर ठरत असल्याने व्यावसायिकांनी दर पंधरा दिवसाला कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप यांनी केले . कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे प्रशासनाकडून 3 जून कोरोना चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरास डॉ संदीप पुंड यांनी भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी बोलताना डॉ संदीप पुंड म्हणाले की आता नागरिक लक्षणे जाणवल्यास तात्काळ पुढे येऊन टेस्ट करत आहेत, त्यामुळे कोरोनाची आकडेवारी कमी होत आहे. काही ठिकाणी व्यावसायिक सुपर स्प्रेडर ठरत असल्याने व्यावसायिकांनी दर पंधरा दिवसाला कोरोना चाचणी करायला हवी. कोरोना चाचणी शिबीर असलेल्या ठिकाणी भेट देऊन डॉ पुंड आढावा घेत आहेत.

कोरोना चाचणी शिबिरात आरोग्य सेवक गोरखे, आरोग्य सेवक थोरे यांनी एकूण 119 कोरोना चाचण्या केल्या. सर्व कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये सर्व किराणा दुकानदार, दुध व्यावसायिक, डॉक्टर, मेडिकल चालक,पंक्चर दुकानदार, पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी, कृषी दुकानदार, बँक कर्मचारी, सोसायटी कर्मचारी व संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. कोंभळी गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती न निघाल्याने तालुक्यातून कोरोना लवकरच हद्दपार होईल असा विश्वास माजी सरपंच पै सचिन दरेकर यांनी व्यक्त केला. कोरोना चाचणी दरम्यान आशा सेविका रुपाली गांगर्डे, राधा गांगर्डे,सुमन देशमाने यांनी सहकार्य केले.

यावेळी सरपंच राहुल गांगर्डे, मा. सरपंच पै सचिन दरेकर, तलाठी राहुल खताळ, ग्रामसेवक चंद्रकांत तापकीर , किशोर तांदळे, विकास गांगर्डे आदी उपस्थित होते.