कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील खांडवी गावात गावरान गाईने दोन तोंडाच्या दुर्मिळ वासराला जन्म दिला आहे. या वासराचे तोंड एकमेकांपासून विरुध्द दिशेला असून ते अशा पध्दतीने जुळलेले आहे की त्यांना एकूण तीन डोळे आहेत. आज सकाळी दोन तोंडे असलेल्या या दुर्मिळ वासराचा जन्म झाला आहे. या वासराला दोन तोंडे, तीन डोळे, दोन कान आहेत. दादा तापकीर यांनी वासराला बाटलीने दूध पाजले असून गाई व वासरू ठीक असून वासरू आता उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले.  अश्या दुर्मिळ घटनांमध्ये बहुतांश वेळा गाई अथवा वासरू दगावण्याची शक्यता असते.

 दोन तोंडाचे वासरू हा दुर्मीळच प्रकार असला; तरी यापूर्वीही अशा प्रकारच्या वासरांना गाईंनी जन्म दिलेला आहे, असे पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी कुलदीप चौरे यांनी सांगितले. फलन प्रक्रियेवेळी शुक्राणूंतील बदलांमुळे गर्भात काही बदल होत असतात; परंतु प्रभावी शुक्राणूंमुळे अशा प्रकारचा मोठा बदल होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही बातमी आजूबाजूच्या परिसरात वार्‍यासारखी पसरली व सर्वानी या वासराला पाहण्यासाठी गर्दी केली होती.