![]() |
| संग्रहित छायाचित्र |
वाळू माफियांचे धाडस वाढले, कठोर कारवाई करण्याची गरज.
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील वाळू माफियांचे महसूल व पोलीस प्रशासनाने कंबरडे मोडले असले तरी वाळू चोरी काही थांबण्याचे नाव घेत नाही. आता तर थेट तलाठ्याला दमदाटी , शिविगाळ करण्याइतपत वाळू तस्करांची मजल पोहोचली आहे. तलाठ्याला दमदाटी, शिवीगाळ करून वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना तालुक्यातील घुमरी येथे घडली आहे.
तालुक्यातील घुमरी नजीक सीना नदीपात्रात कारवाई करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयाकडे न्हेत असताना वाळू तस्करांनी तलाठी केसकर यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत ट्रॅक्टर आष्टी तालुक्याच्या हद्दीत अज्ञान इसमाने पळवून नेला. तलाठी धुळाजी केसकर यांच्या फिर्यादी वरून सचिन महादेव अनभुले रा घुमरी व एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय दंडाधिकारी अर्चना नष्टे व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घुमरी सीनापात्रात अवैध वाळू उपसा होत आहे. 1 जून रोजी सकाळी 09/30 वा. उपविभागीय दंडाधिकारी अर्चना नष्टे व तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी तलाठी केसकर, ए. आर. कोकाटे, ए. पी. रोडगे, एन. व्ही. साळुंके, डी. एम. बिरुटे, राठोड यांचे पथक तयार करून घटनास्थळी पाठवले. सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास या पथकाने घुमरी गावाच्या शिवारात नदीपात्रात छापा टाकला. त्या ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने मजूर लावून विनापरवाना वाळू उपसा करीत असल्याचे आढळून आले.
अवैध वाळू उपसा कारवाई केलेले ट्रॅक्टर कर्जत येथे आणत असताना ट्रॅक्टर चालक सचिन अनभुले याने आपल्या मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीला फोन करून बोलावून घेतले. त्या अज्ञात इसमाने अंगात निळी जीन्स, पांढरा शर्ट व गळ्यात भगवा पंचा टाकलेला होता. तेथे येताच त्याने ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले. चालक सचिन अनभुले याने तलाठी धुळाजी केसकर यांना शिवीगाळ करत ट्रॅक्टरमधून ढकलून दिले. अज्ञान इसमाने तलाठी केसकर यांना पकडुन ठेवत त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह आष्टी तालुक्याच्या हद्दीत पळवून नेला.
कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
उपविभागीय दंडाधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे,नायब तहसीलदार मनोज भोसेकर ,तलाठी धुळाजी केसकर , सोनवणे, रोडगे,बिरुटे आदींनी ही कारवाई केली.


