कर्जत, दि ६ जुन(प्रतिनिधी) : चक्रीवादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडतात. जी झाडे पडली, त्यात विदेशी झाडेच अधिक असल्याचे समोर आले आहे, देशी जातींची झाडे मात्र खंबीरपणे उभी राहिली असल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या  वादळांचा सामना करण्यासाठी, तसेच झाडे वादळाच्या तडाख्यातही उभी राहतील यासाठी देशी झाडांची लागवड करणे गरजेचे असल्याचे प्रगती नर्सरीचे संचालक शरद तनपुरे यांनी म्हंटले आहे. नवीन वृक्षारोपण करताना कोणती झाडे लावावीत, याबाबतच्या धोरणाचा अभ्यासपूर्ण पुनर्विचार करून स्थानिक परिस्थितीनुसार झाडांची निवड करण्यात यावी.

मुंबई तोकते वादळाने विदेशी झाडे उन्मळून पडली,  या घटनेतून सर्वांनी बोध घ्यायला हवा, सध्या पावसाळा सुरू झाला आहे. काल पर्यावरण दिनानिमित्त अनेकांनी झाडांनी लागवड केली आहे. इथून पुढेही अनेकजण वेगवेगळी झाडे लावतील, वृक्षलागवडीचे समारंभ होतील. त्यात कोणती झाडे लावणार आहोत, याचे आयोजकांनी व लावणाऱ्यांनी विचारमंथन करणे गरजेचे आहे.परदेशी झाडे वेगाने वाढत असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात लागवड होते.  विदेशी झाडे अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी लावलेली असतात. वादळात उन्मळून पडणाऱ्या झाडात विदेशी झाडांचे प्रमाण मोठे आहे. त्यांत सोनमोहर, गुलमोहर, गुळभेंडी  अश्या झाडांचा समावेश आहे. त्यामुळे पुढील काळात वृक्षारोपण करताना प्राधान्याने स्थानिक प्रजातींचीच झाडे लावणे गरजेचे आहे. 

आपल्या परिसरात लावण्यात येणाऱ्या झाडात सुबाभूळ झाडाचे प्रमाण मोठे आहे. ही विदेशी झाडे निरुपयोगी आहेत. देशी झाडांचा उपयोग पशू-पक्षांचे अन्न व निवाऱ्यासाठी होतो. शिवाय दर पावसाळ्यात सुबाभळीच्या फांद्या मोडतात त्याचा मोठा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. भविष्यात येणाऱ्या वादळांचा सामना करण्यासाठी कडूनिंब, वड, पिंपळ, उंबर, आंबा, वावळा आदी देशी व सहज उपलब्ध होणारी झाडे लावायला हवी. देशी झाडे गर्द सावली देतात. झाडे लावताना देशी झाडांचा विचार होणे गरजेचे आहे.