कर्जत,दि.६ जुन (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील आरोग्य केंद्रातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी चक्क आरोग्य केंद्रातील लस चोरून आणल्याचे समोर आले आहे. नातेवाईकांना देण्यासाठी चापडगाव आरोग्य केंद्रातुन लस घेऊन आष्टी तालुक्यातील कडा आरोग्य केंद्रात लस देताना हा प्रकार उघडकीस आला आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल कारवाई करण्याचे प्रस्तावित असल्याचे माहिती कर्जतचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली. अश्या प्रकाराने लसींचा काळाबाजार उघडकीस आला आहे.
कर्जत तालुक्यातील चापडगाव आरोग्य केंद्रात विठ्ठल खेडकर हा आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. कर्जत तालुक्यातील चापडगाव आरोग्य केंद्रातुन शनिवारी त्याने लसीची एक कुपी चोरून कडा आरोग्य केंद्रात गेला. तेथे त्याच्या सहा नातेवाईकांना लस देणार होता. कडा येथे गेल्यावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांकडून लस काढून घेण्यात आली.
कर्जतचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड म्हणाले की सदर कर्मचारी हे मुदतबाह्य लस घेऊन गेले होते, अशी मुदतबाह्य लस देने हे चुकीचे असून त्याच्याकडून लस परत जमा करून घेण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे.


