कर्जत (प्रतिनिधी) : कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लक्षात घेता या वर्षी ही कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव रद्द करण्यात येत असून ३,४ आणि ५ ऑगस्ट रोजी कर्जत शहरात कडक लॉकडाऊन पाळण्यात येईल. यासह कर्जत शहरात येणारे सर्व रस्ते नाकाबंदी करून या चेकपोस्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. तरी सर्वसामान्य नागरिकांनी या काळात प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले. प्रशासनाने आयोजित केलेल्या संत सदगुरु श्री गोदड महाराज यात्रा कमिटी व शांतता समितीच्या बैठकित बोलत होत्या. ४ ऑगस्ट बुधवार रोजी कामिका एकादशी दिवशी कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांची मोठी यात्रा कर्जत शहरात भरते. मात्र यंदा देखील कोरोना पार्श्वभूमीवर व कर्जत शहर आणि तालुक्यातील वाढते कोरोना रुग्णाची संख्या पाहता संत सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव सर्वांच्या सहमतीने आणि शासनाच्या नियमानुसार रद्द करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव रद्द करण्यात आला असून याबाबत नियोजन करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा शांतता बैठक पंचायत समिती मध्ये संपन्न झाली. यावेळी बुधवारी संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात परंपरे अनुसार अभिषेक आणि पुजा, मोजक्याच पुजारी आणि सेवेकरी याच्या हस्ते पार पडेल अशी ग्वाही उपस्थित यात्रा कमिटीच्या सदस्यांनी तालुका प्रशासनास दिली. यात्रा काळात दि ३,४ आणि ५ जुलै रोजी कर्जत शहरात कडक लॉकडाऊन तालुका प्रशासनाने जाहीर केला असून या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी बाहेर पडू नये असा निर्णय घेण्यात आला आहे. यासह कर्जत शहरात प्रवेश करत असणाऱ्या आक्काबाईनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ईदगाह मैदान, कोरेगाव रोड आणि कापरेवाडी वेस या पाच ठिकाणी कडक नाकेबंदी करण्यात येणार अ बाहेरील व्यक्ती आणि वाहनांना प्रवेश नाकारला जाईल. याबैठकीस तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक गटविकास अधिकारी रुपचंद जगताप, ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ काकडे, यांच्यासह श्री गोदड महाराज यात्रा कमिटीचे सदस्य, पुजारी, सेवेकरी, मानकरी, राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुके, उपाध्यक्ष प्रवीण घुले, यात्रा कमिटीचे अध्यक्ष मेघराज पाटील, अभय पाटील, सुरेश खिस्ती, सुरेश काकडे, संतोष नलवडे, तानाजी पाटील, अमोल सोनमाळी अनिल गदादे, हभप दत्तात्रय शिंदे आदींनी सुचना मांडत त्यावर प्रशासनाने अंमलबाजवणी करण्याची विनंती केली. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाने आपल्या घरीच पुजा करून दर्शन घ्यावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी ज्ञानदेव काकडे, सुनील नेवसे, बिभीषण खोसे, काकासाहेब धांडे, महेश जेवरे, तात्यासाहेब ढेरे, 9 प्रदीप पाटील, काका लांगोरे, सतीश पाटील, गजानन फलके, तात्यासाहेब क्षीरसागर, शरीफ पठाण, बाप्पासाहेब धांडे, संजय काकडे आदी उपस्थित होते.