कर्जत (प्रतिनिधी) : गावाच्या सुव्यवस्थेला वेगळी दिशा देणारी व आपल्या गावात आपली सुरक्षा आपल्या हातात आहे हे लोकांना समजावून सांगणारी ग्राम सुरक्षा यंत्रणा कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुक येथे ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी सुरु केली आहे. यामध्ये गावातील कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो.
आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांसह संबंधित प्रशासकीय यंत्रणेला सतर्क करण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राम सुरक्षेचा नवीन प्रयोग येथे राबविण्यात येत आहे. या सुरक्षा प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी ग्रामस्थ, पोलिस प्रशासन, आरोग्य विभागाला सतर्क केले जाते. दिलेल्या टोल फ्री क्रमांकावरून निर्धारित २५ सेकंदात कोणत्याही घटनेची माहिती वा सूचना देण्यात येते. याद्वारे सर्व संबंधित यंत्रणांना क्षणार्धात घटनेची माहिती मिळते व परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था होते.
याद्वारे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी ग्राम सुरक्षा रक्षक, जिल्हा पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग एका कॉलवर जोडले गेले आहेत. या यंत्रणेसाठी मोबाईलमध्ये बॅलन्स व नेट नसतानाही या यंत्रणेचा वापर नागरिकांना करता येतो.
चोरी, रस्ते अपघात, महिला छेडछाड, दंगल, रेशन विषयक, ग्रामसभा, सरकारी योजनांची माहिती, लहान मुले पळवून नेणे, वाघ, बिबट्या, तरस हल्ला अशा घटना घडल्यास एका फोनवर हजारो नागरिकांपर्यंत हा मेसेज जातो व त्या नागरिकाला मदत मिळते. या सुरक्षा यंत्रणेमध्ये खोटी बातमी वैयक्तिक संदेश, दशक्रिया वर्षश्राद्ध, वाढदिवस शुभेच्छा, धार्मिक किंवा जातीय तणाव निर्माण करणारे संदेश सामाजिक शांतता धोक्यात आणणारे संदेश ही ग्राम सुरक्षा यंत्रणा स्वीकारत नाही.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा.
गावच्या सुव्यस्थेला वेगळी दिशा देणारी ग्राम सुरक्षा यंत्रणा गावात कार्यान्वित केली असून संकटकालीन परिस्थितीत ग्रामस्थांना सतर्क करण्यासाठी या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर होत आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे क्षणार्धात घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळत आहे.
- पूजा सूर्यवंशी, सरपंच, चांदे बुद्रुक.


