कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील मुळेवाडी येथे विविध क्षेत्रात गावचे नाव रोशन करणाऱ्या भूमिपुत्रांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सातारा येथे कार्यरत असणारे सहाय्यक निबंधक श्री संजयसुद्रिक यांची जिल्हा उपनिबंधक पदी पदोन्नती झाल्याने त्यांचा मुळेवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.  तसेच विशाल मुळे यांची युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये कृषी अधिकारी या पदावर निवड झाल्याने, डॉ. संदीप मुळे यांची महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता नववी व दहावी सेतू केंद्राचा गटप्रवर्तक म्हणून निवड  झाल्याने , लवेंद्र जगधने यांची  मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आदी भूमीपुत्रांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव संपतराव सूर्यवंशी हे होते.  यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना संपतराव सूर्यवंशी म्हणाले की, तरुणांनी उच्च ध्येय ठेवावे व त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी जेणेकरून यश सहज मिळेल. कायम सकारात्मक विचार विद्यार्थी व शेतकरी यांनी करावा. नकारात्मक विचाराने ऊर्जा कमी होते व कोणतेही काम साध्य होत नाही. तसेच ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या कष्टाचे चीज होईल असे वागून स्वतःचे नाव मोठे करावे. 

 सहाय्यक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप म्हणाले संजय सुद्रिक हे अतिशय गरीब कुटुंबातील परंतु होतकरू जिज्ञासू शांत संयमी असणारे व्यक्तिमत्त्व कायमच समाजाची सेवा करत राहणे हा त्यांचा ध्यास त्यामुळे त्यांची उपजिल्हा निबंधक या पदी निवड झाल्याने संपूर्ण गावाचा आनंद द्विगुणित झालेला आहे.  सत्कारमूर्ती संजय सुद्रिक म्हणाले ग्रामस्थांनी  केलेला माझा सत्कार अविस्मरणीय असून तो मी कधीही विसरणार नाही व मला ग्रामीण भागाची जाण असल्याने मी समाजाप्रती असणाऱ्या बांधिलकीची कायम जपवणूक करेल व सर्वसामान्यांना न्याय देण्याची माझी भूमिका राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही पुढील पिढीचे आदर्श घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर परीक्षेत नावलौकिक मिळवावा. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप,पोलीस निरीक्षक आजिनाथ रायकर, फेडरल बँकेचे विभागीय प्रबंधक विकास मुळे, शिवशक्ती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक  विनीत सूर्यवंशी, मुळेवाडीचे सरपंच  बबनराव मुळे ,दत्ता मुळे ,भाऊसाहेब जगताप व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. सुत्रसंचालन सरपंच बबनराव मुळे यांनी केले.