कर्जत (प्रतिनिधी) :  तालुक्यातील कुळधरण येथे डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते चेक पोस्टचे उद्घाटन करण्यात आले. आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून हे चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. यावेळी 'कर्जत लाईव्ह'च्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेचे अधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष महेंद्र गुंड, प्रशासक सी. एम. पवार, पोलीस पाटील समीर जगताप, बबन सुद्रिक, उमेश जगताप, पत्रकार प्रा. किशोर कांबळे, संतोष रणदिवे, सोमनाथ गोडसे, प्रा. किरण जगताप, प्रशांत अडसूळ, पोलीस कॉन्स्टेबल सुनील माळशिकारे, भाऊसाहेब यमगर, विकास चंदन यांच्यासह कुळधरण ग्रामविकास संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले, ग्रामस्थांची अनेक दिवसापासूनची चेक पोस्टची मागणी आता पूर्ण झाली आहे. चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे. अनोळखी व्यक्तीचे संशयास्पद वर्तन दिसल्यास त्याची माहिती ग्रामसुरक्षा दलाला द्यावी. पोलीस कर्मचारी या भागातील कामे चेक पोस्टमध्ये बसून पूर्ण करतील. महेंद्र गुंड यांनी गावात सीसीटीव्ही बसविणार असल्याचे जाहीर केले.

डीवायएसपी अण्णासाहेब जाधव म्हणाले, आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उभारलेले चेक पोस्ट या भागासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीने पोलिसिंगचे काम केल्यास गुन्हे रोखता येतील. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हे चेक पोस्ट महत्त्वाचे ठरेल. तालुक्यात ग्रामसुरक्षा दलाची यंत्रणा मोठ्या प्रमाणावर सक्रियतेने काम करत आहे. युवकांच्या माध्यमातून होत असलेले हे काम उल्लेखनीय आहे. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ गोडसे यांनी केले. समीर जगताप यांनी आभार मानले.