कर्जत (प्रतिनिधी) : मांगल्याची मूर्ती आणि ओम नमोजी आद्या अशी आरंभबिंदूची आद्य देवता गणराय-गणपती च्या उत्सवाचे वेध आता प्रत्येकाला लागले आहेत. बाप्पाच्या मूर्तीचे आगमन, तिची प्राणप्रतिष्ठा, तिच्या सजावटीकरिता काहीतरी वेगळे करण्यासाठी मनाशी बांधत असलेले आराखडे हे प्रत्येक घरात नाविन्याचा शोध घेऊ लागले आहेत. तर दुसरीकडे सभोवतालच्या वातावरणात होत असलेले पर्यावरणीय बदल, कुठे अतिवृष्टीने आलेला महापूर तर कोठे पावसाने अजिबात न लावलेली उपस्थिती, कुठे लहान मोठ्या वादळाने झालेले नुकसान तर कोठे कोविड च्या साथीची अजूनही न ओसरलेली भीतीची छाया असे सामाजिक चित्र आहे, तरी पण बाप्पाचे आगमन म्हणजे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी मिळणारी ऊर्जा. पण ही ऊर्जा आपल्याला मिळणार आहे, ज्या बाप्पाची आपण मनोभावे पूजाअर्चा करणार आहोत त्या बाप्पाचा उत्सव पर्यावरण पूरक साजरा केला तर! आपण निसर्गाच्या रक्षणाला आपल्या घरातूनच सुरवात करायला हवी. त्यासाठीच आपण आपल्या कर्जत शहरात या वर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणार आहोत असे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सांगितले आहे.

पर्यावरण पूरक गणेशोत्सव या उपक्रमात सहभागी होण्याच्या अटी शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.

१. सदर उपक्रम फक्त कर्जत शहरापुरताच मर्यादित आहे. 

२. शाडूच्या मूर्तीकरिता शहरातील प्रथम संपर्क करणाऱ्या ५०० नागरिकांना शाडूच्या मूर्तीचे मोफत वाटप कर्जत नगर पंचायत मार्फत करण्यात येणार आहे.

३. बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीची अथवा पर्यावरणपूरक वस्तूंपासून तयार केलेली असावी.

४. तिच्यावरचे रंग देखील पक्के नैसर्गीक असावेत.

५. बाप्पाची सजावट देखील प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर न करता नैसर्गिक, पर्यावरण स्नेही असावी.

६. या बाप्पाचे विसर्जन ही आपल्याला आपल्या घरातील कुंडीतच करून याच शाडूच्या मातीत आपल्या बाप्पाचे स्मरण म्हणुन या कुंडीत / अंगणात एक भारतीय प्रजातीचे (देशी), स्थानिक झाड लावायचे आहे. 

७. या उपक्रमात भाग घेण्यासाठी इच्छूक पर्यावरण प्रेमी नागरिक स्वतः शाडूची गणेश मूर्ती विकत घेऊन अथवापर्यावरणपूरक 'वस्तूंपासून नाविन्यपूर्ण मूर्ती बनवून ही सहभागी होऊ शकतात. 

८. दि. १३ सप्टेंबर २०११ रोजी पर्यावरण पूरक अशा नैसर्गिक सजावटीचा जिओ टॅग सेल्फी फोटो घेऊन तो नगर पंचायतला पाठवायचा आहे.

९. ज्या गृहिणींची सजावट पर्यावरण पूरक/नैसर्गिक घटकांपासून निर्मित असेल, त्यांचाच विचार पुढील उपक्रमासाठी केला जाईल.

१०. दि.१९/०९/२०२१ विसर्जनाच्या दिवशी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे घरातच कुंडीत / हौदात विसर्जन करून, बाप्पाच्या स्मरणार्थ एक भारतीय प्रजातीचे रोप लावून रोपासोबत जिओ टॅग सेल्फी फोटो घेऊन तो नगरपंचायतला पाठवायचा आहे.

११. त्यानंतर ह्या रोपाचे वर्षभर संवर्धन करून दि. १४ जानेवारी २०२२ रोजी पुनः एकदा रोपासोबत सेल्फी घ्यावा. 

१२. बाप्पाच्या पूजेतील निर्माल्यातून तसेच नित्यपूजेतील निर्माल्यापासुन खत तयार करून या वर्षीचा गणेश उत्सव शंभर टक्के पर्यावरण स्नेही साजरा करण्याचे आवाहन करण्यात आहे.

१३. मकर संक्रांतीच्या दिवशी संयोजकांनी निवड केलेल्या पर्यावरण पूरक सजावट व जतन केलेल्या वृक्षाचे २ जिओ टॅग सेल्फी यांच्या आधारे उत्कृष्ट अश्या सर्व गृहिणींसाठी ५१ लकी ड्रॉ काढून विजेत्यांचा पैठणी देऊन गौरव केला जाणार आहे.

जिओ टॅग सेल्फी फोटो पाठविण्यासाठी व्हॉट्स एप क्रमांक:- 9890811080

 यावर्षी आपल्या स्वच्छ सुंदर कर्जत शहरातून एक अविस्मरणीय असा पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले आहे.