पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादवांची  नागरिकांना भावनिक साद

चांगल्या कामगिरीसाठी माही आणि जळगाव च्या पोलीस पाटलांचा सत्कार  

कर्जत (प्रतिनिधी) : 'समाजात घडणाऱ्या काही घटना मनाला खिन्न करून जातात...एखाद्याच्या हातून खुनासारखा गंभीर गुन्हा घडतो आणि त्यानंतर सारं आयुष्य बेचिराख होतं...संसारातून-मुलाबाळांपासुन दुर कैदेत रहावं लागतं.शिक्षा भोगताना अनेक महिने वर्षे उलटून जातात...समाजाचा दृष्टिकोन बदलतो!पण अशी वेळ कुणावरही येऊ नये यासाठी नागरिकांनो,चांगले जीवन जगा अशी भावनिक साद कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घातली आहे.

        प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारी अशीच एक घटना आता समोर आली आहे ज्यामध्ये एका आरोपी पित्याला आपल्या मुलांच्या भेटीसाठी आपल्या जीवाची बाजी लावावी लागली आहे. माही-जळगाव (ता.कर्जत) येथील सासरवाडी असलेला नामे काटकोर टाबर चव्हाण हा आरोपी खुनाच्या गुन्ह्यात सध्या औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात गेली चार वर्षांपासुन बंदिस्त आहे.आरोपीची मुले व पत्नी आता माही-जळगाव याच ठिकाणी राहत आहेत परंतू काही महिन्यांपूर्वी याच गावातील एका इसमाशी आपल्या पत्नीने विवाह केला असल्याची माहिती त्याला कारागृहात समजली. त्याने कर्जतच्या पोलीस ठाण्यामार्फत माहिती अधिकारात पत्नी व इतरांची माहिती मागवली.परंतु मिळालेली माहिती चुकीची आहे असे त्याचे मत होते. त्यानंतर आपल्या मुलांच्या भेटीसाठी त्याने वारंवार आपला मेहुणा व सासूला कारागृहाच्या दूरध्वनीवरून संपर्क केला.मात्र त्याला योग्य माहिती मिळत नव्हती. मुलांच्या भेटीसाठी बापाचे काळीज त्याला स्वस्थ बसू देत नव्हते.मुलांच्या भेटीसाठी त्याने गेली ३ आठवड्यांपासून कारागृहातच अन्नत्याग केला आहे. याच कारणासाठी त्याने विविध ठिकाणी विनंती अर्ज पाठवले आहेत.अन्नत्यागामुळे त्याची प्रकृती खालावल्यामुळे औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.मात्र त्याने उपचार घेण्यास नकार दिल्याने अर्धवट उपचारावरच पुन्हा कारागृहात आणण्यात आले. कारागृहातील अधिकाऱ्यांनी विशेष म्हणजे चक्क तेथील अधीक्षकांनीही 'तुझ्या मुलांची भेट घडवून देतो' अशी त्याची समजुत काढली पण त्याने ऐकले नाही. त्यात त्याची प्रकृती आणखीनच खालावली.त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी तात्काळ हलवण्यात आले.आरोपीच्या मुलांच्या भेटीसाठी त्याच्या मेहुण्याला व सासूला कारागृहाकडून वारंवार दूरध्वनीवरुन सांगण्यात आले त्याच्या प्रकृतीबाबतही माहिती देण्यात आली मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.'मुलांच्या भेटीनंतरच मी अन्नग्रहण करीन' असा त्याने पावित्रा घेतला. औरंगाबाद कारागृह कार्यालयाने कर्जतच्या पोलीस निरीक्षकांना फोन करून मदत करण्याबाबत कळविले. त्यावरून पोलीस निरीक्षक यांनी याबाबत आमचे जळगावचे पोलीस पाटील हनुमंत शिंदे चांगले काम करू शकतात असे कळवून पोलीस पाटील श्री. यांना सदर मुलांना सदर आरोपीच्या भेटीसाठी जानेबाबत कळविले व त्याबाबत पत्र देण्याबाबत जेल प्रशासनाला कळविले. भेटीसंदर्भात कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना भेट घालून देण्याबाबत पत्रव्यवहार केला.कारागृहातील अधिकाऱ्यांनी यादव यांना फोन करून भेट घालून देण्याबाबत विनंतीही केली.पोलीस निरीक्षक यादव यांनी माहीजळगावचे पोलिस पाटील हनुमंत शिंदे व नातेवाईकांच्या समक्ष आरोपीच्या मुलांना थेट औरंगाबाद कारागृहात पाठवले.आता आरोपी पित्याची आणि मुलांची नुकतीच भेट झाली असुन आरोपीने अन्नग्रहण केली असल्याची माहिती यादव यांनी दिली आहे.

सदरचे काम चांगल्या पद्धतीने पार पडल्याबाबत जळगाव चे पोलीस पाटील हनुमंत शिंदे यांचा तसेच चांगल्या कामगिरी बाबत माही चे पोलीस पाटील महेश कदम यांचा पोलीस निरीक्षक कर्जत यांनी कर्जत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांच्या समक्ष सत्कार केला.

तुमची एक चुक करू शकते आयुष्याची होळी !

         आपल्या एका चुकीमुळे संपुर्ण कुटुंबाची वाताहत अन् होळी होऊ शकते.आपल्याकडून कधीही,कसलाही गुन्हा घडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायलाच हवी. माणसाची जात व धर्म कोणताही असो मात्र रक्ताच्या नात्यांपुढे तो हतबल होतो.आयुष्यभर दुःखात आणि आपल्या प्रियजणांपासून विरहात राहण्याची वेळ येणं ही फार वेदनादायी बाब आहे.

  - चंद्रशेखर यादव,पोलिस निरीक्षक