कर्जत (प्रतिनिधी) : ग्राम सुरक्षा यंत्रणा राबवल्यामुळे चोरी, दरोडे यासारख्या घटना टाळण्यासाठी वरदान ठरत आहे.गावात चोरी झाली, आग लागली, लहान मुल हरवले, वाहन चोरीला गेले, शेतातील पिकाची चोरी झाली, अपघात झाला, वन्यप्राण्याने हल्ला केला अशा कुठल्याही आपत्ती तसेच दुर्घटनेच्यावेळी जवळच्या व्यक्तींना तातडीने संदेश मिळावा, यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेने देण्यात आलेल्या 1800 270 3600 या टोल फ्री नंबरवर फोन केल्यास त्याचा आवाज फोनद्वारे परिसरातील यंत्रणेला नोंदणी केलेल्या हजारो नागरिकांना त्वरित मोबाइलवर ऐकू जातो. नागरिकांना घटना घडत असतानाच तिची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते. कर्जत तालुक्यातील थेरगाव शिवारातील पेट्रोल पंपावरील दरोडा ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे टळला होता, परंतु तालुक्यातील खांडवी येथे भरदिवसा चोरी झाल्यानंतर कोंभळीचे पोलीस पाटील शरद भापकर यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना सूचना दिल्या होत्या, परंतु नागरिकांनी या कॉलला गांभीर्याने न घेतल्याने कोंभळी येथे अर्ध्या तासाच्या अंतरावर चोरी झाली होती. त्यामुळे नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या संदेशाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
‘सहाय्यम् सर्वतो सहस्त्रश:’ या ब्रीदनुसार ग्राम सुरक्षा यंत्रणा अहमदनगर सह विविध जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे. या यंत्रणेमध्ये मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करून नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी ग्रामसुरक्षा यंत्रणेमध्ये केलेली असेल त्याच क्रमांकावर संकटकालीन, सूचना संदेश दिला जातो. या मोबाइल नेटवर्कमध्ये पोलिस यंत्रणाही जोडलेली आहे. यामुळे पोलिसांकडूनही तातडीने प्रतिसाद मिळण्यास मदत होते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेचा आता चोरी व दरोड्या टाकणाऱ्यांवर वॉच राहणार असून ही यंत्रणा चोरट्यांना सळो की पळो करून सोडणार आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यात या यंत्रणेची मदत होणार आहे.
फेक कॉल टाळले जातात.
गंमत म्हणूनही ग्रामसुरक्षा यंत्रणेवर कॉल येण्याची शक्यता असते. कॉल केल्यानंतर जे शब्द वापरले जातात. त्यानुसार ते कॉल सत्य कि असत्य हे पडताळूनच काल पूर्ण केला जातो. त्यामुळे फेक कॉल न येण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. कॉल करणाऱ्याने स्वतःचे नाव, पत्ता, गाव आणि घडलेली घटना व द्यावयाचा संदेश 25 सेकंदात पूर्ण झाला पाहिजे. संकटकाळात कोणताही व्यक्ती ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या क्रमांकावर फोन कॉल करून मदतीचे आवाहन करू शकते.
प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये गावात असणाऱ्या प्रत्येक घरातील प्रत्येक मोबाइल नंबर नोंदवून आपत्कालीन परिस्थितीत एकाच वेळेस जवळपास सर्वच क्रमांकांवर संपर्क करण्याची यंत्रणा राबविली जात आहे. त्यामुळे संकटात असणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत मिळत असून पोलीस नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी कॉल देत असतात या कॉल ला नागरिकांनी गांभीर्याने घेऊन त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
- चंद्रशेखर यादव
पोलीस निरीक्षक, कर्जत
एकविसाव्या शतकातील सर्वात प्रभावी माध्यम म्हणून मोबाइलचा उपयोग केला जातो. याच मोबाइलचा वापर करून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. सरकारी यंत्रणा व ग्रामसुरक्षा यंत्रणेशी जोडलेले नागरिक यांच्या मदतीने आवश्यक ठिकाणी त्वरित मदत उपलब्ध होत असल्याने एकप्रकारे ग्रामसुरक्षा यंत्रणा वरदानच ठरत आहे.
- प्रवीण तापकीर
सरपंच, ग्रामपंचायत खांडवी