आ. रोहित पवारांच्या प्रयत्नातून ३ कोटी ५५ लक्ष रुपयांचा निधी

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील २८ गावांसाठी जीवनदायिनी असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजनेत राष्ट्रवादीचे युवा नेते आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून आता आणखी ४ अतिरिक्त पाझर तलावांचा सामावेश करण्यात आला आहे. या कामासाठी ३ कोटी ५५ लक्ष रुपयांचा निधीची तरतुद करण्यात आलेली आहे.कर्जत तालुक्यातील तुकाई सिंचन योजनेअंतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्रातील एकूण २० पाझर तलाव व ३ ल.घू.पाटबंधारे योजनांमध्ये पाणी सोडण्याचे व तलाव भरून देण्याचे व त्यानंतर या पाणी साठ्याचा पिण्यासाठी व सिंचनासाठी या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र या सिंचन योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा विचार करता या योजनेत आणखी वाढीव पाझर तलावांचा सामावेश व्हावा यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार.रोहित पवार यांचे प्रयत्न सुरू होते.या योजनेत मागील शासनाच्या काळात गोयकरवाडी, खंडाळा, वाघळी,चांदे बुद्रुक येथील चार पाझर तलावांचा समावेश करण्यात आलेला नव्हता ही बाब तेथील नागरिकांनी आ.रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली व नागरिकांची मागणी लक्षात घेत त्यांनी तातडीने २९ जानेवारी २०२० रोजी शासनास पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला.मंत्रिमंडळाच्या 'मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्यासमवेत ही बैठक घेण्यात आली होती.मंत्री शंकरराव गडाख यांनी संबंधित गावांचा सामावेश करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.त्या अनुषंगाने प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग नाशिक यांनी शासनास २२ जुलै २०२० रोजी शासनास सुधारित प्रस्ताव सादर केला.आता चारही गावांचा पाझर तलावात समावेश झाला आहे. मुळात तुकाई सिंचन योजना शेती सिंचनासाठी पुरेशी ठरणारी नसली तरी ही योजना आहे या स्थितीत पूर्णत्वास जावी व योजनेतून काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना मदत व्हावी असा अट्टाहास आ.पवार यांचा राहिलेला आहे.हे करत असताना आणखी काही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणता येतील का?याबाबत त्यांचा प्रयत्न सुरू आहे.या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण मूळ २० पाझर तलाव व ३ लघु पाटबंधारे तलाव या पाटबंधारे योजनांमध्ये अतिरिक्त वाढीव ४ पाझर तलावांचा सामावेश झाल्याने आता या पाझर तलावांची संख्या २४ झाली आहे. या उपसा सिंचन योजनेंतर्गत तब्बल ५९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.तुकाई सिंचन योजना पुर्वी नियोजित झाली असली तरी ती खुप चांगल्या पद्धतीने नियोजित झाली आहे असे नाही, मात्र मतदारसंघाच्या दृष्टीने विकासाचे लहान किंवा मोठे काम होत असेल आणि त्यास निधी प्राप्त होत असेल तर कोणतेही राजकारण न करता आ.रोहित पवार तो निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करत असतात हे त्यांचे विशेष अधोरेखित झाल्याशिवाय रहात नाही.

 'तुकाई सिंचन योजनेत वाढीव गावांचा सामावेश व्हावा यासाठी मी राज्यशासनाकडे विनंती करून पाठपुरावा केला.त्यानंतर त्याबाबतचा सर्व्हे देखील करण्यात आला .तुकाई योजनेच्या पाईपलाईनच्या क्षमतेनुसार संबंधित वाढीव गावांचा सामावेश झाला.या वाढीव तलावांचा योजनेत सामावेश होऊन हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आदींचे मी आभार मानतो.

          -आ.रोहित पवार