चंद्रशेखर यादव यांचे आवाहन; गुन्हेगारी रोखण्यासाठी  पोलीस यंत्रणा अलर्ट

कर्जत (प्रतिनिधी) : 'चोरी रोखण्यासाठी व चोरट्यांबाबत सतर्कता दाखवण्यासाठी कर्जत पोलिसांकडुन तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत नागरीकांना फोनकॉल करून याबाबत माहिती दिली जाते, तरीही नागरीकांकडून सतर्कता दाखवली जात नाही.दुर्लक्ष केल्यामुळे चोरी-घरफोडीच्या घटना घडतात. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा सक्षमपणे वापर करावा  व गुन्हेगारी रोखण्यासाठी सतर्क रहावे असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

        तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहे.एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला असेल किंवा गुन्हेगार गुन्हा करण्याच्या तयारीत असतील तर तेथील नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत केलेल्या एकाच फोनकॉलवर शेकडो तरुण तात्काळ घटनास्थळी पोहोचतात.आग लागली,चोरी-घरफोडी झाली,मुल हरवले, वाहन चोरीला गेले,अपघात झाला,हल्ला झाला अशा कोणत्याही आपत्तीवेळी नागरीकांनी १८००२७०३६०० या क्रमांकावर फोन करून मदत मागितल्यास त्याच परिसरातील शेकडो नागरिक काही क्षणात मदतीस येऊन होणारी विपरीत घटना रोखता येते.यामुळेच तालुक्यातील चांदे बुद्रुक येथे लागलेली मोठी आग असेल, कर्जत पेट्रोल पंपावर पडलेला दरोडा असेल अशा घटनांवर यशस्वी नियंत्रण मिळवता आले.अनेक मोठ्या घटना या यंत्रणेमुळे टळल्या आहेत.मात्र अजुनही काही नागरीक या यंत्रणेणे दिलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचे व कुटुंबाचे आर्थिक,शारीरिक नुकसान करून घेतात. चोरट्यांकडून चोरी-घरफोडीचे प्रकार होत असताना प्रसंगी शारीरिक गंभीर इजा देखील केली जाते.अनावधानाने घटना घडलीच तर तात्काळ कॉल देऊन चोरट्यांना पकडले जाऊ शकते. घटना घडताना कर्जतची पोलिस यंत्रणा प्रत्येकाच्या घरावर,वैयक्तिक मालमत्तेवर लक्ष ठेऊ शकत नाही परंतु घटना घडूच नये म्हणून त्यांनी दिलेल्या सुचना-संदेशाचे पालन केले तर मोठ्या प्रमाणावर हानी व होणारा धोका टळू शकतो.

ज्यांना कॉल आले त्यांच्याच घरी चोरी !

       दि.३ रोजी दुरगाव येथे चोरीचा प्रयत्न झाला त्यावेळी मी स्वतः व राशीनचे पोलिस कॉन्स्टेबल गणेश भागडेंनीही यंत्रणेमार्फत तालुक्यातील नागरीकांना पैसे, दागिने सांभाळण्यासाठी सतर्कतेचा कॉल दिला होता.त्यानंतर अर्ध्याच तासात राशीन येथे चोरी झाली.विशेष म्हणजे चोरी झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर तेथील नागरिकांनी,आम्हाला सतर्कतेचा कॉल आला असल्याचे सांगितले.नागरीकांची दक्षता घेतली असती तर कदाचित चोरी रोखता आली असती. काही दिवसांपूर्वी कोंभळी येथे सुद्धा चोरी झाली, त्यांना घटनेच्या आगोदर पोलीस पाटील यांनी दिलेला कॉल आला होता तरीही त्यांनी त्या घरी चोरी झाली. नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. चोरटे तुमच्या बाजूला आले आहेत असा  ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कॉल आल्यावर तात्काळ रस्त्यावर आलं पाहिजे, जेणेकरून चोरट्यांना पकडता येईल, त्यांचा पाठलाग करता येईल..

           - चंद्रशेखर यादव,पोलिस निरीक्षक.