पारनेर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे ठिकठिकाणी युवकांकडून जल्लोषात स्वागत.
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके नुकतेच कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. आमदार निलेश लंके यांच्या कोरोना काळातील कामाला भारावून गेलेल्या युवकांनी त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. आ. लंकेच्या स्वागतासाठी घोगरगाव, कोंभळी फाटा, चिंचोली, थेरगाव, कोंभळीसह तालुक्यातील गावात युवक रस्त्यावर येऊन थांबले होते. आ. लंके आल्यानंतर सेल्फी काढण्यासाठी युवकांची झुंबड उडाली होती. रक्तदान शिबीराच्या निमित्ताने आ. लंकेचा कर्जत तालुक्यातील पहिलाच दौरा होता. आ. लंके यांनी कर्जत तालुक्यातील कोंभळी व कुळधरण येथील रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले. या दौऱ्याच्या माध्यमातून आ. लंकेनी एकप्रकारे खासदारकीची साखरपेरणीच सुरू केल्याचे बोलले जात आहे.
आमदार नीलेश लंके यांनी काही महिन्यांपूर्वीच 'वेळ आल्यास लोकसभेची निवडणूकही आपण सक्षमपणे लढण्यास तयार आहोत,’ अशा शब्दांत भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांना आव्हान दिले होते.
यावरून आ. निलेश लंके लोकसभेची निवडणूक लढवतील अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे आ. निलेश लंके समर्थक तसेच कार्यकर्त्यामध्ये उत्साह वाढलेला दिसून येत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर मधून राष्ट्रवादीचे आ. लंके उमेदवार असतील का नाही हे येणारा काळच सांगू शकेल.



