कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील करपडी येथील रस्त्याची अवस्था पावसाने दयनीय झाली होती, अहमदनगर जिल्यातील पानगे वस्ती व सोलापूर जिल्ह्यातील मेरगळ वस्ती ला जोडणारा दोन्ही जिल्ह्याच्या सरहद्दीवरील महत्त्वाचा रस्ता आहे. लोकप्रतिनिधिंकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही हा रस्ता दुर्लक्षित राहिलेला होता. स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती.
गणेशोत्सवाचा खर्च टाळून करपडी गावातील युवकांकडून स्वखर्चाने श्रमदानातून रस्त्याचे मुरुमीकरण करण्यात आल्याने 100 रहिवाशांचा रहदारीचा प्रश्न मिटला आहे.
करपडी मधील महेश पानगे,भाऊ आंबघरे, शिवाजी पानगे,बाळू पानगे,गजानन येडे,राहुल मेरगळ,शिवाजी मेरगळ, पवन पानगे,चांगदेव मेरगळ, अण्णा मेरगळ आदींनी सुमारे 35000 रुपये खर्च करत रस्त्याचे मुरुमीकरण केल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.



