पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण; पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज
कर्जत (प्रतिनिधी) : नगर व परजिल्ह्यातील वाहने आपल्या हद्दीत आल्यावर कोणतीही कारणे दाखवत त्यांच्याकडून आर्थिक वसुली करण्यासाठी भिगवण (ता.इंदापूर) येथील पोलीस ठाण्याचे कर्मचारी अव्वल आहेत. या वसुलीसाठी त्यांच्याकडून नव-नवे फंडेही आजमावले जात आहेत. भिगवण येथे मोठी बाजारपेठ असल्याने बाहेरून आलेली असंख्य वाहने वेगवेगळ्या खरेदीसाठी येथे थांबतात. स्थानिक व आसपासची वाहने तर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दुकानांच्या समोर तासंतास लागलेली असतात. मात्र परजिल्ह्यातील वाहनांवर करडी नजर ठेवून असलेले काही पोलीस कर्मचारी जणु शिकार सापडल्यासारखे नवख्या वाहनांवर तुटून पडतात.
'वाहन रस्त्याच्या कडेला उभे आहे, वाहनावर कारवाई करणार आहोत, तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत, आमचे साहेब खुप चिडले आहेत, वाहन पोलीस स्टेशनला घ्या' अशी अनेक नानाविध कारणे देऊन वाहन चालकांसोबत कर्मचारी हुज्जत घालतात. यावर वाहनचालकांनी विचारणा केली तर काही पोलीस कर्मचारी दादागिरी व दमदाटी करतात.समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याची त्यांची अजिबात मानसिकता नसते. परजिल्ह्यातील वाहनचालक असल्याने तर खूपच क्रूर वागणूक देतात. ज्या ठिकाणी वाहने उभी केली जातात त्या ठिकाणी 'नो पार्किंग' असा कोणताही झोन नसताना स्थानिक वाहने सोडून अन्य ठिकाणची वाहने टार्गेट केली जात आहेत. वाहनचालकांशी चर्चा न करता वाहनचालकांच्या वाहनांच्या चाव्या काढून घेणे, शिवीगाळ करणे, वाहन चालकांची कॉलर पकडणे प्रसंगी मारहाण करणे असे प्रकार हे पोलीस नित्याने करत आहेत.
कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक बनत असतील तर अशा पोलिसांकडून सामान्यांनी काय आदर्श घ्यावा? असा सवाल वाहनचालक करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्या अशा दादागिरीचे नवनवे प्रताप पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमते, गर्दी जमल्यावर या मस्तवाल वर्दीच्या अंगात आणखीनच बळ येते. आपली दहशत माजवण्यासाठी हे कर्मचारी मोठा स्टंट करतात. पोलिसांच्या या बेताल वागण्यामुळे पोलीस यंत्रणेची प्रतिमा मालिन होत आहे. पोलीस खात्याची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या बेशिस्त पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कायद्याबरोबरच शिस्तीचे धडे देण्याची खरी गरज आहे.


