अवैध वृक्षतोड करून विनापरवाना वाहतूक करणारा टेम्पो पकडला.
कर्जत (प्रतिनिधी) : अवैध वृक्षतोड करून विनापरवाना वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर मिरजगाव परिसरात सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वनविभागाने कारवाई केली. टेम्पो जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आणून त्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अजिनाथ भोसले यांनी दिली.
कर्जत तालुक्यात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करून विनापरवाना लाकूड वाहतूक होत असते, मिरजगाव परिसरात वनविभागाला विनापरवाना वृक्षतोड करून वाहतूक करणारा टेम्पो एम एच १६ क्यू ३९२४ आढळून आला , वनविभागाने तो जप्त केला आहे, त्या टेम्पो मध्ये चिंच व लिंब प्रजातीची लाकडे आहेत. टेम्पो मालक पाराजी बाबा मुळे ( रा. मुळेवाडी ता कर्जत ) यांच्यावर रात्री उशिरा पर्यंत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आजिनाथ भोसले व महेश काळदाते यांनी मिरजगाव परिसरात सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अवैध वृक्षतोड करून विनापरवाना चिंच व लिंब प्रजातीच्या लाकडांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई केली आहे. यापुढेही अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येईल असे भोसले यांनी सांगितले.
वनविभागाचा कारवाईचा फार्स
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड करून विनापरवाना वाहतूक होत असते, अनेक वेळा कर्जत शहरातून देखील ही वाहतूक होते , मात्र वनविभागाच्या अर्थ"पूर्ण संबंधामुळे त्यांना लाकूड तस्करांची ही वाहने दिसून येत नाहीत, अनेक महिन्यातून एखाद्या वाहनावर कारवाई करून त्याला दंड करण्यात येतो, परत ते लाकूड तस्कर वाहतूक सुरू करतात त्यामुळे अनेक महिन्यातून एकदा केलेली कारवाई कारवाईचा फार्स ठरत असल्याचे दिसून येत आहे. लाकूड तस्करांकडून वनविभागाला अर्थपूर्ण सहकार्य मिळाले नाही तरच लाकूड तस्करांवर वनविभाग कारवाई करत असल्याचे बोलले जात आहे.


