कर्जत (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतींना लाखो रुपयांमध्ये निधी येत असतो, या निधीमधून नागरिकांना सोई सुविधा मिळाव्यात यासाठी हा निधी देण्यात येतो , मात्र काही ग्रामपंचायतींकडून या निधीचा योग्य वापर होताना दिसून येत नाही, फक्त बिल काढण्यासाठी ते काम थातुरमातुर पद्धतीने करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. उत्कृष्ट दर्जाचे, दीर्घकाळ टिकणारे, वर्षानुवर्षे नागरिक त्याचा वापर करतील, लाभ घेतील असे काम होताना दिसत नाही.


असेच एक काम तालुक्यातील चिंचोली रमजान या गावात झाले आहे. सन २०२० - २१ मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ योजनेअंतर्गत ३ लाख ९० हजार रुपये खर्चून महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक सौचालये बांधण्यात आली आहेत. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे सार्वजनिक सौचालये उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून उदघाटना आधीच या सौचालयांची दुरावस्था झाली आहे. या सौचालयांचे दरवाजे मोडले आहेत, तसेच आतमधील भांडी फुटली आहेत, टाकीत पाण्याचे पाईप फिटिंग अर्धवट आहे. त्यामुळे ही सौचालये सुरू होण्यापूर्वीच त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ही सौचालये नागरिकांसाठी खुली होणार का अशीच मोडकळीस जाणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे तसेच वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची देखील मागणी होत आहे.