कर्जत ( प्रतिनिधी) :
जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या मिरजगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून मिरजगावमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. या योजनेत अनेक त्रुटी आहेत. सुरू असलेले कामदेखील निकृष्ट पद्धतीचे असल्याचा आरोप करत, अमृत लिंगडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आज येथील मुख्य चौकात एक तास रास्ता रोको आंदोलन केले. तसेच गाव बंद आंदोलन करण्यात आले.

या योजनेच्या निविदाप्रक्रियेची माहिती देणे, वापरण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांचा आकार व त्यांची गुणवत्ता, याकडे लक्ष देणे, पूर्ण क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती, रस्त्याच्या मधोमध जलवाहिन्या खोदणे, जुन्या व धोकादायक स्थितीतील टाक्यांचा वापर न करणे, राष्ट्रीय महामार्गावरील जलवाहिनी हस्तांतर प्रक्रियेची माहिती मिळणे, नळजोडणीचा खर्च ग्रामस्थांवर टाकू नये आदी मागण्या आंदोलनकल्यांकडून करण्यात आल्या.


या आंदोलनात डॉ. पंढरीनाथ  गोरे, प्रशांत बुद्धिवंत, डॉ. चंद्रकांत कोरडे, तानाजी पिसे, सागर पवळ, अभिजित जवादे, संदीप बुद्धिवंत, रामदास तनपुरे, बबन दळवी, कुलदीप गंगावणे, अमोल बावडकर, पप्पूशेठ कोठारी, पोपट कोरडे, आजिनाथ फरताडे, सलीम आतार, प्रकाश चेडे आदी सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय अभियंता मुळे यांनी, सदर मागण्यांचा गांभीयनि विचार करून एक महिन्याच्या आत प्रस्ताव दाखल करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

आंदोलनस्थळी राडा

आंदोलनकर्ते योजनेवर टीका करत असताना माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन खेतमाळस आंदोलनस्थळी पोचले. आणि बोलण्यासाठी प्रयत्न केले मात्र योजनेचे काम सुरू असताना हे कुठे गेले होते, त्यावेळी यांनी बोलायला हवे होते, आम्हाला माहिती अधिकाऱ्यांकडून ऐकायची आहे, असे अमृत लिंगडे यावेळी म्हणाले, मात्र यांचं कुठे नडल आहे, हे येड्यावाणी कश्यासाठी करत आहेत हे मला सांगूद्या असे म्हणत नितीन खेतमाळस यांनी माईक घेण्याचा प्रयत्न केला. यावरून शाब्दिक खडाजंगी उडाली होती. त्यांना आवरताना सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव सुपेकर, बळीराम काकडे यांच्यासह पोलिसांचा चांगलाच कस लागला.