कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून दोन जेसीबी, दोन टेम्पो व एक ब्रास वाळू असा एकूण ५० लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सागर राजेश शिंदे, (वय २७, रा. वडळी, ता. श्रीगोंदा), शुभम दत्तात्रय अधोरे (वय २४, रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंदा) असे ताब्यात घेलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याकडे विचारपुस केली असता संतोष ऊर्फ बंटी कोथंबीरे (रा. साळनदेवी रोड, ता. श्रीगोंदा) याच्या सांगण्यावरून वाळू उपसा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी की, कर्जत येथील राक्षसवाडी तळ्यातील संतोष ऊर्फ बंटी कोथंबीरे हा त्यांचे हस्तका मार्फत जेसीबीचे मदतीने वाळुचा उपसा करुन ट्रॅक्टरमध्ये भरुन वाहतूक करत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी संभाजी कोतकर, सचिन आडबल, रोहित मिसाळ, मयुर गायकवाड यांच्या पथकाला सूचना देवून कारवाई करण्याची सांगितले. त्यानुसार राक्षसवाडी तळ्याजवळ जावून पथकाने कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून दोन जेसीबी व दोन ट्रॅक्टर टॉली व एक ब्रास वाळुसह असा एकूण ५० लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.