कर्जत (प्रतिनिधी) : शनिवारी (दि. २९ एप्रिल रोजी) दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील खांडवी मधील भवानी नगर परिसरातील शेतकरी नेमीचंद बाबासाहेब तापकीर यांची अडीच एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली आहे, तोंडाशी आलेला घास निसर्गाने क्रूर होत हिरावून घेतल्याने येथील शेतकरी उध्वस्त झाला आहे. दोन दिवस उलटूनही कर्जत जामखेड च्या आमदार महोदयांनी याची दखल घेतली नाही.
शेतकऱ्याचे सुमारे ५० ते ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची बाग अवकाळी पावसाने उध्वस्त झाल्याने तापकीर कुटुंबीय अजून त्या धक्क्यातून सावरलेले नाही, सध्या कर्जत जामखेड मध्ये बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मतदारसंघातील दोन्ही आमदार प्रा राम शिंदे व आ रोहित पवार या शेतकऱ्याकडे अजून फिरकले नाहीत, शिवाय अधिकारी सुद्धा अजून आले नाहीत. निवडणुकीत व्यस्त असणाऱ्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कधी कळवळा येणार हे अद्याप समजायला मार्ग नाही. त्यामुळे या शेतकरी कुटुंबाची मानसिकता ढासळत चालली आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
निवडणुकीच्या काळात हातापाया पडणारे राजकीय मंडळी शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले असताना त्याची दखल घ्यायला तयार नसतील तर शेतकऱ्यांनी पण जरूर या गोष्टीचा विचार करायला हवा. कर्ज उरावर घेऊन जगणाऱ्या शेतकऱ्याचे आज ५० लाखांचे नुकसान झाले आहे, शेतकरी मदतीची वाट पाहत आहे परंतु प्रशासन याची दखल घ्यायला तयार नाही. - धनराज तापकीर, खांडवी


