मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव.

कर्जत (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यभरातून घेण्यात आलेल्या पिक स्पर्धेत कर्जत तालुक्यातील निमगाव गागंर्डा येथील शेतकरी दिपक तुकाराम ढगे यांनी सन २०२२-२३ मध्ये खरीप हंगामात झालेल्या पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. उडीद पिकाच्या उत्पादकतेत ते राज्यात प्रथम आले आहेत. 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यभरातून घेण्यात आलेल्या पिक स्पर्धेत ढगे यांच्या उडीद पिकाची उत्पादकता ही  ३३ क्विंटल / हेक्टर ईतकी आली होती.   जिल्ह्यात ते  उडिद उत्पादकतेत प्रथम आलेच होते, मात्र आता राज्य स्तरावर देखील ते प्रथमच आले आहेत. कृषी विभागाच्या श्री. सागर जवणे  यांनी लागवडी संदर्भात वेळोवेळी केलेले अन्नद्रव्य व्यवस्था पन, किड व रोग व्यवस्थापन  विषयक मार्गदर्शन त्यांनी तंतोतंत प्रत्यक्षात राबवले, याचा त्यांना  उत्पादनवाढीत  फायदा झाला. 

तालुकास्तरावर प्रथम आल्याबद्दल ५ हजार रुपये, जिल्हास्तरावर प्रथम आल्या बद्दल १० हजार रुपये , राज्यात प्रथम आल्या बद्दल ५० हजार रुपये या पद्धतीने एकुण एकत्रित ६५ हजार रुपये च्या पुरस्काराचे दिपक ढगे हे मानकरी ठरले आहेत.

मुख्यमंत्री व पालकमंत्री  यांच्या हस्ते होणार सत्कार

६ मे रोजी होणाऱ्या खरीप आढावा बैठकीत त्यांना अहमदनगर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तसेच लवकरच राज्य स्तरावर होणाऱ्या खरीप आढावा बैठकीत त्यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते  गौरवण्यात येणार आहे.