रस्त्याच्या डागडुजीचा ठेकेदाराला विसर

कर्जत (प्रतिनिधी) : निकृष्ट दर्जाचे काम, आणि त्यामुळे उखडलेला डांबरी रस्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराकडे देखभाल दुरुस्तीची हमी असताना देखील रस्त्याची दुरुस्ती होत नाही, म्हणून अश्या ठेकेदारांना काळ्या यादीत कोण टाकणार असा प्रश्न नागरिक व प्रवाशी विचारात आहेत. 

कर्जत तालुक्यातील कोंभळी ते खांडवी रस्त्याचे ३ किलोमीटर लांबीचे काम मार्च २०१९ मध्ये सुरू झाले आणि मार्च २०२० मध्ये पूर्ण झाले , या कामासाठी  १ कोटी ४२ लाख रूपये खर्च करण्यात आले , मात्र काम झाल्यानंतर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्याचे डांबरीकरण उखडले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, काम पूर्ण झाल्यापासून ५ वर्षे त्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असताना देखील या रस्त्याची दुरुस्ती होत नाही. १० ते १५ दिवसांवर पावसाळा आला आहे, त्यामुळे या रस्त्याची देखभालदुरुस्ती होणे गरजचे आहे.

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला होता, मात्र हा इशारा प्रत्यक्षात मात्र उतरलेला दिसून आला नाही, ठेकेदारांबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने त्यांचे देखील अश्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे खराब कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत कोण टाकणार असा प्रश्न नागरिक व प्रवाशी विचारात आहेत. दरम्यान आ रोहित पवार व आ राम शिंदे तालुक्यातील कामे दर्जेदार करून घेण्यासाठी कठोर पावले उचलणार का हे आगामी काळात दिसून येणार आहे.