पहिल्या दिवशी विद्यार्थी आले चारचाकी गाडीतुन.
कर्जत (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागण्यासाठी शाळेत विविध उपक्रम घेणे गरजेचे असते तसेच विविध उपक्रमाच्याद्वारे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होत असतो असे प्रतिपादन खांडवीचे सरपंच प्रवीण तापकीर यांनी केले.
तालुक्यातील खांडवी (वाकणवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्वागताच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकनवाडी (खांडवी ) येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी इ. १ ली च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रभातफेरी च्या निमित्ताने नवागत विद्यार्थ्यांचे चारचाकी गाडीतून वाजत गाजत शाळेत आगमन झाले. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थी पालक भारावून गेले होते, त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लाजराबुजरा असणारा हा दिवस आज अनोखा आनंद देणारा ठरला. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.
तसेच सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. या कार्यक्रमासाठी खांडवी गावचे सरपंच प्रवीण तापकीर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पठारे, भाऊसाहेब पठारे, दादासाहेब एकाड, दादा वायसे, ज्ञानदेव खुडे, महेश वायसे, सागर पठारे उपस्थित होते , शाळेतील उपक्रमशील शिक्षक दिगंबर वाळके व अमोल गांगर्डे यांच्या कल्पनेतील या स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.


