कर्जत (प्रतिनिधी) : उतारा म्हणून टाकलेला व सर्व बाजूंनी टाचण्या खोसलेला नारळ शुक्रवारी दुपारी पत्रकार किरण जगताप यांच्या कुळधरण येथील शेतात आढळून आला. अंधश्रद्धेतून हा नारळ टाकल्याचे निदर्शनास आल्याने सोशल मीडियातून त्यावर चर्चा करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने सामाजिक संदेश देण्यासाठी कर्जत तालुका प्रेस क्लबच्या व्हाट्सअप ग्रुपवर 'मी हा नारळ खाणार आहे, आपण खाल का ?' अशी पत्रकार बांधवांना विचारणा केली. त्यावर अनेक पत्रकारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

'उतारा' म्हणून टाकलेला नारळ हा भारलेला नसतो, त्यात कोणतीही अद्भुत शक्ती येत नाही. त्या नारळामुळे मानवी शरीरावर, मनावर कसलाही परिणाम होत नाही, हा व असा  जनजागृती करणारा सामाजिक संदेश देण्यासाठी आपण सामूहिकपणे हा नारळ खाऊ, असा निर्णय पत्रकारांनी घेतला. रविवारी होणाऱ्या पत्रकारांच्या बैठकीत या नारळाचे सेवन केले जाणार आहे. 

कर्जत तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष योगेश गांगर्डे, उपाध्यक्ष किशोर कांबळे, सचिव किरण जगताप, खजिनदार अस्लम पठाण, जिल्हा प्रतिनिधी महादेव सायकर, सदस्य संतोष रणदिवे, मिलिंद राऊत व इतर पत्रकार यामध्ये सहभागी होणार आहे. स्वेच्छेने कोणीही यामध्ये सहभागी होऊ शकतात.