कर्जत (प्रतिनिधी) : सध्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्याना शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे, मात्र ग्रामीण भागात सुरू असलेल्या रस्त्यांना वनविभागाकडून आडकाठी  दाखवण्यात येत आहे.

तालुक्यातील रवळगाव ते कोंभळी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे काम वनविभागाने काम थांबवले आहे. सदर ठिकाणी वर्ग 2 चे क्षेत्र असताना वनविभागाचे क्षेत्र असल्याचे कारण पुढे करत या रस्त्याचे काम अडविण्यात आले आहे, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.

आता या रस्त्यासाठी निधी येऊन काम सुरू झाले होते, मात्र रस्ता विकास कामांमध्ये शासनाच्या विभागाकडूनच आडकाठी घालण्याचे काम होत आहे , सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देऊन अश्या रस्त्यांसाठी काय उपाययोजना करणार का हे सुद्धा पाहणे गरजेचे झाले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी आलेल्या निधीतून कामे लवकर पूर्ण व्हावीत यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

शिंदे फडणवीस सरकार पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध झालेला असताना वन विभागाची आठमुठी भूमिका अडसर ठरत आहे, शासन निर्णय असेल तर बांधकाम विभागाकडे स्पष्टपणे लेखी पत्रव्यवहार केला पाहिजे, निविदा होऊन रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर तो अडवणे हे शासनाच्या वेळेचा अपव्यय होय, याची दखल न घेतल्यास सरकार दरबारी कैफियत मांडून मोठे आंदोलन उभारणार आहे.

- शेखर खरमरे (सरचिटणीस, भाजपा, कर्जत)