अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना स्टेट बँकेने दिले २० लाख रुपये.

कर्जत (प्रतिनिधी) : अपघात झाल्यानंतर आपण भावनिक आधार त्या कुटुंबियांना देऊ शकतो, मात्र स्टेट बँक कर्जत त्यांना आर्थिक आधार देण्याचे काम करत आहे, शासनाच्या विमा योजना जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम स्टेट बँकेकडून चांगल्या पद्धतीने होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे, तेव्हा लोकांना कोणताच आधार राहत नाही, त्यामुळे कमी हप्त्यावर जास्त विमा रक्कम मिळत आहे असे प्रतिपादन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांनी केले.

स्टेट बँकेमार्फत अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे.  या मालिकेत स्टेट बँक ऑफ इंडिया कर्जत शाखेने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका खातेदाराच्या कुटुंबाला विमा रक्कम म्हणून 20 लाख रुपयांचा धनादेश दिला.  तसेच इतर चार लाभार्थ्यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले , यावेळी ते बोलत होते.


एका खातेदाराने बँकेच्या एसबीआय वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत विमा काढला होता. ज्यामध्ये एक हजार रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर वीस लाख रुपयांपर्यंतचे जोखीम संरक्षण आहे.  नुकताच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.  त्यानंतर विम्याच्या रकमेसाठी कुटुंबीयांच्या वतीने दावा केला होता.  आवश्यक कार्यवाही करत बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र जाधव आणि बँक कर्मचारी यांनी लाभार्थ्यांना विम्याची रक्कम देण्याबाबत कार्यवाही केली. 

दरम्यान गुरुवारी भारतीय स्टेट बँक कर्जत शाखेमध्ये धनादेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व लाभार्थ्यांना कर्जत पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले,एका ग्राहकाने वार्षिक विमा रक्कम १ हजार असलेला विमा घेतला होता, त्या ग्राहकाचे वारस रुक्मिणी भाऊसाहेब डिसले यांना यावेळी  रुपये वीस लाख चा स्टेट बँकेच्या वैयक्तिक अपघात विमा चा लाभ देण्यात आला.


जया एकनाथ पवार या लाभार्थ्याला रक्कम रुपये दोन लाख हे रुपी कार्ड चा अपघाती संरक्षण विमा देण्यात आले व दोन लाख प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत देण्यात आले. असे एकूण चार लाख देण्यात आले. मारुती शिवाजी सावताडे यांना रुपये दोन लाख हे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजना अंतर्गत देण्यात आले.वैशाली अशोक निक्षे यांना दोन लाख हे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला. 

वरील सर्व योजना चा लाभ बँकेमार्फत घेण्याचे आवाहन भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकारी श्री राजेंद्र जाधव यांनी केले. सदर योजनांचे महत्त्व व लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांनी केले.


सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या कर्जत शाखेचे कर्मचारी मिलिंद पाटील, राजीव दाभाडे, महेश मोहोळकर, विशाल निंभोरे, अजित भोसले, सौरभ केवटे, दादा मोरे, तुषार कुमठेकर, हरीश कांबळे व दत्तू बंडगर यांनी विशेष योगदान दिले. यावेळी मा पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गोरे, काळे सर आदिसांह ग्राहक व लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार मिलिंद पाटील यांनी मानले.

यावेळी बोलताना स्टेट बँकेचे शाखाप्रमुख राजेंद्र जाधव म्हणाले की, अपघातामध्ये गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही, परंतु अपघाती विम्या मुळे त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागू शकतो,  अपघाताचे प्रमाण वाढले आहे, कर्ता व्यक्ती अपघातामध्ये गेल्यास कुटुंब चालवणे अवघड होते, त्यामुळे या प्रकारच्या विम्या मधून कुटुंबास आर्थिक संरक्षण मिळून कुटुंब चालवण्यास मदत होते.


योजनांची नावे खालील प्रमाणे

१. वैयक्तिक अपघात विमा योजना एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी रक्कम रुपये 1000 वार्षिक हप्ता भरल्यास अपघाती वीस लाख रुपये मिळतात

२. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना अंतर्गत रक्कम रुपये 436 वार्षिक हप्ता भरल्यास रक्कम रुपये दोन लाखाचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास विमा रक्कम मिळते.

३. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत रक्कम रुपये वीस रुपये भरून दोन लाखाचा अपघात संरक्षण विमा वारसास मिळतो.