कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत ते कुळधरण मार्गे श्रीगोंदयाला जोडणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने प्रवाश्यांचे हाल होत आहेत, श्रीगोंदा घोडेगाव- हिरडगाव- लोहकरा ओढा हद्दीपर्यंत मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊन खड्डे पडले आहेत,  त्यामुळे सदर रस्त्याची १५ दिवसांत दुरुस्ती केली नाही तर रस्ता दुरुस्तीसाठी योग्य त्या न्यायालयात किंवा मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीगोंदा  यांच्याविरुध्द कर्जत तालुका वकील असोसिएशन न्याय मागणी करणार आहे, तसे निवेदन कर्जत तालुका वकील असोसिएशनच्या वतीने श्रीगोंदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.

कर्जत तालुका वकील असोसिएशनच्या वतीने श्रीगोंदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्जतवरुन श्रीगोंदा येथे जाण्यासाठी कर्जत-कुळधरण घोडेगाव मार्गे श्रीगोंदा येथे येण्यासाठी रस्ता आहे. सदर रस्ता हा सर्व लोक, सर्व वाहने, तसेच शासकीय कामकाज करण्यासाठी श्रीगोंदा येथे जाणे येणेसाठी वापर करतात. गेले अनेक दिवस झाले सदरचा रस्ता खराब झालेला आहे. त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी, तसेच मणक्याचे आजार, वाहनांचे नुकसान तसेच रस्ता खराब असल्यामुळे होणारा मनस्ताप असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागने पुर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. कर्जत येथून श्रीगोंदा येथे अनेक लोकांसाठी न्यायालयात यावे लागते. यापूर्वी सुध्दा आपणांकडे अनेक तक्रारी अर्ज करुन सुध्दा आपण रस्ता दुरुस्ती केलेला नाही. रस्ता हा आज खराब झालेला नाही. अनेक वर्षे झाले सदरचा रस्ता खराब झालेला आहे. त्यामुळे आपण पावसाळा आहे तसेच नवीन रस्ता होणार आहे त्याची निवीदा निघालेली आहे अशी उडवाउडवीची कारणे सांगून आपण आज पर्यन्त सदरचा दुरुस्ती केलेला नाही.

दरम्यान सर्व बाबींची काळजीपुर्वक कारणे लक्षात घेवून येत्या १५ दिवसांत रस्ता दुरुस्ती केला नाही तर रस्ता दुरुस्तीसाठी योग्य त्या न्यायालयात किंवा मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभाग विरुध्द कर्जत तालुका वकील असोसिएशन न्याय मागणी करणार आहे,  सध्याच्या परिस्थीतीत शासन आपल्या दारी तसेच विविध शासनाचे चांगल्या प्रकारचे उपक्रम असताना सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीगोंदा यांनी पुर्णपणे सरकारच्या कसल्याही योजनेकडे लक्ष दिलेले नाही. म्हणून आपण तातडीने सदरचा रस्ता खड्डेमय मुक्त करण्यात यावा व आम्हाला डांबरीकरणाचे स्पॅच किंवा डांबराने खड्डे भरुन द्यावेत अशी मागणी कर्जत तालुका वकील असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनावर कर्जत तालुका वकील असोसिएशनचे अध्यक्ष यांच्यासह वकील बांधवांच्या सह्या आहेत.