कर्जत (योगेश गांगर्डे) : कर्जत तालुक्यातील थेरगाव गावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक गणेश पंडित रायकर यांनी गडचिरोली सारख्या संवेदनशील भागात काम केले आहे, गडचिरोली येथील संवेदनशील भागात केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने सन्मानीत करण्यात आले होते.
गणेश रायकर यांची 2015 मध्ये मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे 14 महिन्याचे प्रशिक्षण घेऊन 11 जून 2016 रोजी ठाणे शहर येथे रुजू झाले. परंतु नक्षली भागात काम करण्याची जिद्द असल्याने त्यांनी विनंती अर्ज करून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आपली बदली करून घेतली. भामरागड तालुक्यातील पोलीस मदत केंद्र असलेल्या कोठी, नारगुंडा आणि धोडराज अश्या संवेदनशील ठिकाणी काम केले.
रायकर यांनी ऑपरेशन सेल गडचिरोली येथे देखील काम केले आहे. नक्षली भागात काम करत असताना नक्षल विरोधी अभियान राबविले असून आदिवासी तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम केले. आदिवासी बांधवामध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. तसेच गणेश रायकर यांनी लोकसभा, विधानसभा, आणि ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी बंदोबस्त, नियोजन केलेले आहे.पोलीस महासंचालक व पोलीस निरीक्षक यांनी रायकर यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देण्यात आले होते.


