कर्जत (प्रतिनिधी) : वाळू चोरीला लगाम घालण्यासाठी घरपोच वाळूचे धोरण शासनाने हाती घेतले असले तरी हे धोरण अजून प्रतक्ष्यात उतरलेले दिसून येत नाही, त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू आहे, रस्त्याच्या कामासाठी अवैध मुरूम वाहतूक होत आहे , त्याकडे महसुलच्या पथकाने डोळेझाक करत तालुक्यातील कोंभळी येथील शेतकरी नवनाथ रामभाऊ गांगर्डे हे त्यांच्या जमिनीचा विकास करत असताना महसुलच्या पथकाने तेथील वाहनांवर कारवाई केल्याने जिल्हाधिकारी साहेब,महसुलचे पथक वाळू माफियांवर कारवाई करण्याची अशी तत्परता कधी दाखवणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एखाद्या भूखंडाचा विकास करताना माती, मुरुम, दगड अशा सर्व प्रकारच्या गौण खनिजाचे उत्खनन करुन ते गौण खनिज त्याच भूखंडाच्या सपाटीकरणाकरिता वापरले जाईल किंवा ती अशा भूखंडाच्या विकासाच्या प्रक्रियेतील कोणत्याही कामासाठी वापरली जाईल, त्यावेळी अशा गौण खनिजावर स्वामित्वधन आकारणीस पात्र राहणार नाही अश्या प्रकारचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय आहे, मात्र महसुलाच्या पथकाने सदर ठिकाणी कोणत्या आधारावर कारवाई केली हे समजू शकले नाही.
कोंभळी येथील शेतकरी नवनाथ रामभाऊ गांगर्डे हे त्यांच्या जमिनीचा विकास करत असताना महसुलच्या पथकाने तेथे काम करत असलेल्या वाहनांवर कारवाई करत वाहने कर्जत येथे नेण्यात आली , तसेच चालकांच्या ताब्यातील मोबाईल काढून घेऊन आम्हाला चोरांसारखी वागणुक महसुलच्या पथकाकडून देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शासन जरी "शासन आपल्या दारी" च्या आणाभाका घेत असले तरी महसूल , भूमी अभिलेख सारख्या विभागाकडून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक काही थांबण्याचे नाव घेत नाही. कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू आहे, विनापरवाना शेतकऱ्यांच्या शेतातील शेकडो ब्रास मुरूम नेण्यात आला आहे , याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रारी देखील केल्या आहेत, काही शेतकऱ्यांनी आंदोलनाचा देखील पर्याय निवडला होता मात्र महसुल विभागाला त्या मुरूमाचा पंचनामा करण्यास देखील वेळ मिळत नसल्याने महसुलच्या कामकाजाचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
अनेक शेतकरी शेतरस्त्यासाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत, तरी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते मिळत नाहीत, महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात महसुलच्या भोंगळ कारभाराने शेतकरी वैतागले असून महसूलमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.


