कर्जत (प्रतिनिधी) :- शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील १४ शिक्षकांचा आणि दोन केंद्र प्रमुखांचा यात समावेश आहे, यामध्ये कर्जत तालुक्यातील बर्गेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका किरण रामराव मुळे यांची निवड करण्यात आली आहे.
किरण रामराव मुळे या बर्गेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, यासंदर्भात शिक्षक व केंद्रप्रमुख यांची १०० गुणांची परिक्षा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर सदर प्रश्नावली प्रसिद्ध केली गेली. शिक्षक व केंद्र प्रमुखांनी पंचायत समिती कार्यालयात स्वयंमुल्यमापन करत प्रश्नावली जमा केली. त्यांच्याकडील प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी पडताळणी केली. सदर प्रस्ताव प्राप्त शिक्षक व केंद्र प्रमुखांची २५ गुणांची लेखी परिक्षा घेण्यात आली. प्रशासकांच्या अध्यतेखाली जिल्हा निवड समितीची बैठक होवून एकूण १२५ गुणांपैकी सर्वाधिक गुण मिळालेल्या प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाचा प्रस्ताव नाशिक विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.
किरण मुळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांमधून अभिनंदन होत आहे.


