कर्जत (प्रतिनिधी) : कोऱ्या कागदावर सही घेवून शेतकऱ्याची फसवणूक केल्याची तक्रार कुळधरणचे तलाठी विकास मोराळे यांच्याविरोधात देण्यात आली आहे. कुळधरण येथील शेतकरी रामचंद्र जगताप ( वय : ७५) यांनी तहसीलदार यांच्याकडे ही तक्रार केली आहे.
तक्रार अर्जात त्यांनी म्हटले आहे, कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे माझ्या नावे असलेल्या गट नंबर ९१३ / ३ मध्ये भरत बापू खराडे, रा. कुळधरण हे मशिनद्वारे माती व मुरमाचे उत्खनन करत असल्याची लेखी तक्रार तहसीलदार यांच्याकडे देण्यात आली होती. उत्खनन करून मुरूम व मातीची हायवाद्वारे वाहतूक करत शेजारच्या भरत बापू खराडे व केशरबाई बापू खराडे यांच्या गट नंबर ९१६ / १ मधील शेतात टाकले असल्याची तक्रार देण्यात आली होती. सर्व वाहनांच्या क्रमांकासह ही तक्रार देण्यात आली. झालेल्या उत्खननाचा पंचनामा करून उत्खनन करणारी व वाहतूक करणारी वाहने जप्त करण्याची कारवाई करावी अशी मागणी या तक्रार अर्जातून करण्यात आली होती.
या तक्रारीनंतर कुळधरणचे तलाठी विकास मोराळे यांनी गट नंबर ९१३ / ३ येथे येवून सुरु असलेले उत्खनन थांबवत असल्याचे सांगितले. मात्र त्यासाठी तुमची सही लागत असल्याचे सांगत तलाठ्याने माझी मजकूर न लिहिलेल्या कागदावर सही घेतली. मात्र त्यानंतर अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार यांच्या कार्यालयातून उत्खननाचा पंचनामा तसेच वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र तहसीलदार यांनी ५ जानेवारी २०२३ च्या मंडळाधिकारी, भांबोरा यांच्या अहवालाचा संदर्भ देवून पत्र क्रमांक कावि/ जमा- गौख / १४७/ २०२३ दि. १३/०२/ २०२३ नुसार हा तक्रार अर्ज निकाली काढल्याचे गेल्या आठवड्यात लेखी पत्र देवून कळवले आहे. माझी तक्रार आजही कायम असून त्यावर आपल्या विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.
तक्रार अर्जात त्यांनी म्हटले आहे, तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दिल्यानंतर कार्यालयाकडून मुरूम उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महसूल विभागाकडून अद्यापपर्यंत उत्खननाचा पंचनामा तसेच वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदारास कोणतीही लेखी माहिती न देता अर्ज निकाली काढल्याचे तहसीलदार यांनी नुकतेच कळविले आहे. तलाठी विकास मोराळे यांनी माझी मजकूर न लिहिलेल्या कागदावर कसलीही माहिती न देता फसवणूक करून सही घेतलेली आहे. त्याची सखोल चौकशी करून तलाठ्यावर योग्य कारवाई करावी. भरत बापू खराडे यांनी ९१३ / ३ मध्ये केलेल्या उत्खननाचा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करून संबंधितावर दंडात्मक कारवाई करावी. दिलेल्या लेखी अर्जाची शहानिशा न करता तसेच मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेल्या क्षेत्राची पाहणी न करता तहसीलदार गणेश जगदाळे यांनी दिलेला तक्रार अर्ज निकाली काढलेला आहे. मला महसूल विभागाने न्यायापासून वंचित ठेवलेले आहे. त्याबद्दल तलाठी यांनी केलेली चुकीची कार्यपद्धती व या अर्जाच्या अनुषंगाने केलेल्या सर्व कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


