कर्जत(प्रतिनिधी) : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) घरपोहच देण्यासाठी डाक विभागाने पुढाकार घेतला आहे. 

कर्जत उपविभागात अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक सुरेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डाक कर्मचारी थेट ज्येष्ठ नागरीकांच्या घरी जाऊन ७० रुपये शुल्क घेऊन हा दाखला देणार आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त धारकांची मोठी सोय होणार आहे. याचा लाभ सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानी घ्यावा, असे आवाहन कर्जत उपविभागाचे, उपविभागीय डाक निरिक्षक अमित देशमुख यांनी केले आहे. यावेळी कर्जत चे पोस्ट मास्तर रावसाहेब चौधरी, सुनील धस आदी उपस्थित होते.

केंद्र तसेच राज्य सरकारी सेवानिवृत्त शासनाकडून कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन (पेन्शन) मिळते. दरवर्षी प्रत्येक सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या हयातीचा दाखला पेन्शन विभागाकडे सादर करावा लागतो. अन्यथा त्या संबंधिताचे सेवानिवृत्ती वेतन बंद केले जाते. हयातीचा दाखला वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

आता डाक विभागामुळे त्यांची ही पायपीट थांबणार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी यांनी मागणी केल्यानंतर त्या भागातील डाक कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचा हयातीचा दाखला जागेवरच तयार करून देणार आहेत.

हयातीचा दाखला मिळविण्यासाठी सेवानिवृत्ती क्रमांक, पेन्शन पेमेंट आर्डर, बँक माहिती, आधारकार्ड या गोष्टी आवश्यक आहेत. बायोमेट्रिक यंत्राच्या सहाय्याने डाक कर्मचारी हा दाखला तयार करून देणार आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना इतरत्र धावपळ करावी लागणार नाही.