कर्जत (प्रतिनिधी) : शहरातील कापरेवाडी वेस परिसरात झालेले अतिक्रमण हे सार्वजनिक बांधकामच्या कक्षेत येत असलेबाबत कर्जत नगर पंचायत ने सार्वजनिक बांधकाम विभागास पत्राद्वारे कळविले होते,शशिकांत बोंगाणे यांनी केलेल्या पत्रव्यहारास उत्तर देत सार्वजनिक बांधकामने ते अतिक्रमण तात्काळ काढण्याची कार्यवाही होईल असे बोंगाणे यांना पत्र देऊन कळविले आणि त्यासाठी पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार करून पोलीस बंदोबस्त ही मागितला , मात्र यामध्ये माशी कुठे शिंकली हे समजले नाही, अतिक्रमण काही निघाले नाही, त्यामुळे अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त दिखावा केल्याचा आरोप शशिकांत बोंगाणे यांनी केला आहे.

 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये करण्यात आलेले अतिक्रमण दूर करावे, या मागणीसाठी शशिकांत दत्तात्रय बोंगाणे, त्यांच्या पत्नी स्वाती बोंगाणे त्यांच्यासह नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर उपोषण करून आंदोलन सुरू केले आहे. बहिरोबावाडीचे सरपंच शरद यादव यांच्यासह अनेकांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे.

शहरातील कापरेवाडी वेस परिसरात करण्यात आलेले बेकायदा अतिक्रमण दूर करण्याच्या मागणीसाठी बोंगाणे यांनी बांधकाम विभागास यापूर्वी पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पत्राची दखल घेत बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले, मात्र अतिक्रमणधारकांनी पूर्वी ग्रामपंचायत असताना या ठिकाणी घरकुलासाठी आम्हाला जागा दिलेली आहे आणि तसा उतारा आमच्याकडे आहे असे सांगितले. यानंतर बांधकाम विभागाने त्यांच्यासह कोणाचीही अतिक्रमण दूर केले नाही.

यामुळे या अतिक्रमण काढण्यासाठी बोंगाणे यांनी कुटुंबीयांसह सर्व बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे. अतिक्रमण जोपर्यंत काढत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे बोंगाणे यांनी सांगितले.