कर्जत(प्रतिनिधी) : बर्गेवाडी येथील प्रकाश भाऊसाहेब माने यांनी पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी सी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. प्रकाश आई वडील भाऊसाहेब माने व रेखा माने आणि आजी आजोबा बुवासाहेब माने आणि नर्मदा माने यांनी अतिशय गरीबीच्या आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये मोलमजुरी, शेती करून प्रकाशला शिक्षण दिले. बर्गेवाडी येथे सवाद्य मिरवणूक काढून स्नेहभोजनासह प्रकाशचा कौतुक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, दादासाहेब सोनमाळी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भानुदास नेटके, उपप्राचार्य प्रा. सुनील देशमुख यांच्यासह दादा पाटील महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रामदास ढगे यांनी केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना अंबादास पिसाळ यांनी माने कुटुंबाच्या संघर्षाचा कालखंड उलगडून सांगितला. प्रकाशच्या यशाने त्यांच्या कष्टाचे झीज झाले अशी भावना व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे राजेंद्र फाळके यांनी प्रकाश तरुणांसाठी आदर्श आहे, त्याने प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून प्रकाशचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन यादव यांनी केले तर माने कुटुंबाच्या वतीने फिन टॅक्स चे महादेव माने यांनी आभार मानले.


