कर्जत (योगेश गांगर्डे) : गळ्यात कांद्याची व द्राक्षाची माळ हातात दुधाची पिशवी घेऊन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमात कांदा निर्यातबंदी व दुधाचे दर पडल्याचा निषेध नोंदवला.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या कर्जत शाखेचा उद्घाटन समारंभ काल (दि. ४) रोजी कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमास महसूलमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, आ प्रा राम शिंदे उपस्थित होते. 

येथील कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, आ प्रा राम शिंदे यांची भाषणे झाल्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते लालासाहेब सुद्रीक यांनी गळ्यात कांद्याची, द्राक्षाची माळ व हातात दुधाची पिशवी घेऊन पालकमंत्री विखे यांना दुधाच्या दरावर व कांद्यावर बोला म्हणत यावेळी निषेध नोंदवला.

चुकीच्या निर्यात धोरणाची टांगती तलवार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ठेवून केंद्र शासनाने शेतकऱ्यांना अनेक वेळा आर्थिक संकटात ढकलले असून, या वेळी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्यात शुल्क लावून अप्रत्यक्ष कांदा निर्यातबंदीद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बळी देऊन उदासिनतेचे धोरण कायम ठेवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. कांद्याला उत्पादन खर्चाची निर्धारित किंमत निश्चित करून त्यापेक्षा अधिक दर मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र सत्ताधारी मात्र यावर ब्र काढताना दिसून येत नाहीत.

शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर शेतकरी संघटनेचे लालासाहेब सुद्रीक यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.